कोल्हापूर/रूकडी-माणगांव : शिवजयंतीनिमित्त माणगांव ता.हातकणंगले येथे शिवज्योत मागे-पुढे घेण्यावरून दोन गटात वाद झाला. या वादाचे पर्यवसान मारामारीत झाले. याप्रकरणी दोन गटाविरुध्द परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.प्रतिवर्षी प्रमाणे हातकणंगले तालुक्यातील माणगांव येथे शिवजयंती साजरी करण्यात येते. यानिमित्य दुचाकी रॅली काढण्यात येते तसेच शिवज्योत गावातून फिरवून येथील शिवाजी चौकात आणली जाते. येथील एका गटाने शिवज्योत आणली असता दुसऱ्या गटातील युवकांनी शिवज्योतीसमोर आपली गाडी पुढे घातल्यावरून दोन गटात बाचाबाची सुरू झाली.
शब्दाला शब्द वाढत गेल्याने त्याचे पर्यावसान हाणामारीत झाले. दोन्ही गट समोरासमोर भिडल्याने कोणकोणास मारहाण करीत आहे. एकमेकांच्यावर दगडफेक आणि लाठीमार यामुळे मध्यस्थी करणाऱ्या युवकांनाही याचा तडाखा बसला. यात गंभीर घाव लागून सहा युवकांना खासगी तर इतरांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या हाणामारीत दोन्ही गटातील युवक जखमी झाले आहेत.दरम्यान, या प्रकारात येथील एक गटातील तीस ते चाळीस युवक दुसऱ्या गटातील कार्यकर्त्यांच्या घरावर चाल करण्याच्या प्रयत्न करीत होते, मात्र सामाजिक कार्यकर्ते अनिल जगदाळे यांनी या युवकाना रोखले, यामुळे पुढील अनर्थ टळला.
पोलीस पाटील करसिध्द जोग यांनी या घटनेची वर्दी हातकणंगले पोलिस ठाण्यात देताच तेथे तत्काळ राखीव दल दाखल झाल्याने वातावरण निवळले. गुन्ह्यात वापरण्यात आलेले तलवारी, गज आणि काठी जप्त करण्यात आले आहे.
गुन्हात सहभागी असलेल्याचे उशीरापर्यत धरपकड सुरू होते. मारामारीत उमेश कोळी, रमेश कोळी, संतोष उर्फ गुंडा जाधव, बाळासो तांदळे, सूरज तादळे, दत्ता बनने, राजू जगदाळे हे जखमी झाले आहेत.
याची नोंद हातकणंगले पोलिस ठाण्यात झाली असून गुन्हा दाखल करण्याचे काम उशीरापर्यंत सुरू होते. पोलिस निरीक्षक सी. एल. डुबल, निरीक्षक रनगर, विजय घाटगे आदींनी घटनास्थळी धाव घेतली.