लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : गोवा येथे होणाºया सतरा वर्षांखालील फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील कोस्टारिका-इराण व नायझर-ब्राझील यांच्यातील सामने मोफत पाहण्यासाठी कोल्हापुरातून दोन हजार फुटबॉलशौकिनांना संधी दिली जाणार आहे. यासह जाण्या-येण्याची सोयही केली जाणार आहे, अशी माहिती ‘विफा’चे उपाध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांनी रविवारी शाहू स्टेडियम येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.भारतात प्रथमच १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा भरत आहे. त्यातील भारताचे सर्व सामने नवी दिल्ली येथे, तर अन्य देशांमधील सामने गोवा येथे होणार आहेत. हीच संधी साधत ‘केएसए’तर्फे कोल्हापुरातील फुटबॉलशौकीन, खेळाडू, प्रशिक्षक, मार्गदर्शक, नवोदितांकरीता गोव्यातील फार्तोडा येथील फुटबॉल स्टेडियमवरील सामने पाहण्यासाठी मोफत तिकिटे व जाण्या-येण्याकरिता बसची सोय केली जाणार आहे. त्यात किमान दोन हजार फुटबॉल शौकीन व संघ, मार्गदर्शक, प्रशिक्षक, पंच अशांची सोय करण्यात आली आहे. याकरीता संघ व्यवस्थापन, खेळाडू, प्रशिक्षक, मार्गदर्शकांनी के.एस.ए.च्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही मालोजीराजे यांनी केले.यावेळी के.एस.ए.अध्यक्ष सरदार मोमीन, महासचिव माणिक मंडलिक, राजेंद्र दळवी, संभाजीराव मांगोरे-पाटील, नितीन जाधव, मनोज जाधव, आदी उपस्थित होते.कोल्हापूर हे कोलकाता, गोवा, मुंबईनंतर ‘फुटबॉलची पंढरी’ म्हणून देशभरात गणले जाते. त्यात भारतात प्रथमच होणाºया या फुटबॉल स्पर्धेत कोल्हापूरचा व महाराष्ट्राचा एकमेव फुटबॉलपटू अनिकेत जाधव हा खेळणार आहे असे अनेक अनिकेत कोल्हापुरातून निर्माण व्हावेत, याकरिता स्पोर्टस् ट्रेनिंग स्कूल स्थापन्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनीही याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. भविष्यात ‘भारतीय फुटबॉलची कोल्हापूर’ ही पंढरी बनेल, असा विश्वास मालोजीराजे यांनी व्यक्त केला.
कोल्हापुरातून दोन हजार फुटबॉलशौकीन जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2017 1:08 AM