कोल्हापूर : दूधाळी येथील महापालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील तीस फुट खोल असलेल्या जॅकवेलमध्ये रंगकाम करताना आॅक्सिजनचा पुरवठा कमी पडल्याने श्वास गुदमरुन सहा कामगार बेशुध्द होवून अत्यवस्थ झाले. त्यांना तत्काळ अग्निशामक दलाच्या जवानानी सीपीआर रुग्णालयात दाखल केले.
सुनाराम हसदा (वय २४), सायबा हसदा (२२), भूपाल हसदा (२७), गरलाई हेबरम (३०), रुपाए मुरमू (२५), उदयराम मंड्डी (२४, सर्व रा. झारखंड) अशी त्यांची नावे आहेत. मंगळवारी दूपारी घडलेल्या प्रकाराने प्रशासकीय अधिकाऱ्यांची धावपळ उडाली.
दूधाळी येथे सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे काम सुरु आहे. येथील तीस फुट जॅकवेलमध्ये मंगळवारी सहा कामगार उतरुन रंगकाम करीत होते. बराचवेळ आतमध्ये राहिल्याने आॅक्सिजन कमी प्रमाणात मिळाल्याने एक-दोघे भोवळ येवून खाली पडले. हा प्रकार पाहून अन्य चौघा कामगारांनी आरडाओरड केली. काहीवेळाने चौघेहि बेशुध्द झाले. कामगारांचा आवाज ऐकून वरती असलेल्या मुकादम संजय कदम व अन्य कामगारांनी टॉवर क्रेनच्या सहाय्याने खाली उतरुन एका-एकाला बाहेर काढले. कामगारांची अवस्था पाहून अग्निशामक दलास फोन करुन बोलविले.
जवानानी घटनास्थळी धाव घेत बेशुध्द पडलेल्या कामगारांना सीपीआर रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी तत्काळ उपचार झाल्याने सर्वजण शुध्दीवर आले. या प्रकाराची माहिती समजताच महापालिकेच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी सीपीआरमध्ये भेट देवून कामगारांच्या प्रकृत्तीची चौकशी केली.
आॅक्सिजन नसल्याने गुदमरलेगेल्या आठवड्याभरापासून जॅकवेलमध्ये रंगकाम सुरु आहे. थांबुन-थांबुन रंगकाम करण्याच्या सुचना दिल्या होत्या. खोलवर जॅकवेल असल्याने याठिकाणी आॅक्सिजन सिलेंडर व एक्झॉक्ट फॅन ठेवला जात होता. मंगळवारी या दोन्ही साधनसामुग्री उपलब्ध नव्हत्या. कामगारांना सुचना देवूनही ते बराचवेळ खाली थांबल्याने गुदरमले अशी माहिती मुकादम संजय कदम यांनी दिली.