कोल्हापूर : दिव्यांग उन्नती अभियानांतर्गत दिव्यांगांना प्रमाणपत्र देण्यासाठी आरोग्य तपासणीस बुधवारपासून सुरुवात झाली. सीपीआर रुग्णालयात पाचगावमधील ४१ दिव्यांगांची तपासणी झाली. आता येथून पुढे रोज एका गावातील दिव्यांगांची तपासणी होणार आहे.जिल्हा परिषदेमार्फत या अभियानाची प्रायोगिक तत्त्वावर तपासणी बुधवारपासून सुरू झाली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी ‘सीपीआर’मध्ये या उपक्रमाचे उद्घाटन केले. या दिव्यांगांना ‘सीपीआर’मध्ये तपासणी आणण्यासाठी व परत नेऊन घरी सोडण्यासाठी के.एम.टी. बसचा वापर करण्यात आला.या तपासणीत अस्थिव्यंग १०, मतिमंद ६, अंध ११, पॅरालिसिस ९, मस्क्युलर १, कर्णबधिर ३ अशी एकूण ४१ जणांची तपासणी सीपीआरमधील वैद्यकीय पथकाने केली. आता तपासणी झालेल्या दिव्यांगांना लवकरच प्रमाणपत्र दिले जाणार आहे. हे प्रमाणपत्र हीच दिव्यांगांची येथून पुढे ओळख असणार आहे. या आधारेच त्यांना दिव्यांग योजनांचा लाभ दिला जाणार आहे.या उपक्रमाला करवीरचे सभापती राजेंद्र सूर्यवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी संजय शिंदे, करवीरचे गटविकास अधिकारी सचिन घाटगे यांच्यासह विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, जिल्हा कक्षातील कर्मचारी उपस्थित होते.