कोल्हापूर : परंपरा आणि नवतंत्रज्ञानाचा मेळ घालणारे अंतर्गत रचनाकार घडावेत, यासाठी कलेचा वारसा जपणाऱ्या विविध संस्था कोल्हापूरमध्ये आहेत. त्यांच्याकडून नव्या पिढीला मार्गदर्शन व्हावे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी येथे केले.येथील कलाप्रबोधिनीज इन्स्टिट्यूट आॅफ डिझाईन या महाविद्यालयातर्फे आयोजित ‘आकृती २०१८’ या वार्षिक प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ‘निर्मिती ग्राफिक्स’चे अनंत खासबारदार प्रमुख उपस्थित होते. पालकमंत्री पाटील म्हणाले, कोल्हापूरची कलापरंपरा जपण्याचे काम कलाप्रबोधिनी इन्स्टिट्यूटकडून होत आहे. नवतंत्रज्ञानाच्या वापरातून ही परंपरा पुढे नेणे गरजेचे आहे.अनंत खासबारदार म्हणाले, ज्या-ज्या ठिकाणी विविध साधने मिळतील, त्यांचा वापर करून वास्तुसजावट, अंतर्गत रचना करावी. एखाद्या घराची अंतर्गत सजावट करताना तेथे राहणाºया व्यक्तींची संख्या, त्यांचा स्वभाव, विचार, आदी बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे.
या कार्यक्रमास ‘कलाप्रबोधिनीज इन्स्टिट्यूट’चे अध्यक्ष जयंत बेगमपुरे, विश्वस्त विजय गजबर, मोहन वायचळ, गिरीश कुलकर्णी, श्रीकांत डिग्रजकर, चंद्रकांत जोशी, आदी उपस्थित होते. सचिव व प्राचार्या गिरिजा कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. सरोज पारिजात यांनी सूत्रसंचालन केले.विद्यार्थ्यांना संधी देण्याचा विचारविविध शासकीय कार्यालये, इमारतीच्या अंतर्गत रचना, सजावटीचे काम करण्याची संधी इंटिरिअर डिझाईन अभ्यासक्रमाच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना देण्याचा विचार करता येईल, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले, त्यातून या कार्यालय, इमारतीच्या सजावटीमध्ये नवीन कल्पना येतील आणि संबंधित विद्यार्थी-विद्यार्थिनींना काम करण्याची एक चांगली संधी मिळेल. या दृष्टीने शिक्षण संस्थांनी विचार करावा.
भालजी पेंढारकर कला अकादमीच्या विकासाच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी सोमवारी (दि. ३०) बैठक घेतली जाईल. ‘कलाप्रबोधिनीज इन्स्टिट्यूट’च्या शैक्षणिक अथवा अन्य पातळ्यांवरील काही अडचणी असल्यास त्या सोडविण्यासाठी सहकार्य केले जाईल.विद्यार्थ्यांचे कौशल्य, नवकल्पनांचे दर्शनया महाविद्यालयातील बॅचलर आॅफ डिझाईन (बी. डेस.) इंटिरिअर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थी-विद्यार्र्थिनींनी वर्षभर केलेल्या इंटिरिअर प्रोजेक्टचा समावेश असलेले ‘आकृती’ प्रदर्शन भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्रात भरविले आहे.
त्यात लँडस्केप डिझाईन्स, पेंटिंग्ज मास्क, पॉट पेंटिंग, क्ले पेंटिंग, नावीन्यपूर्ण चित्रे, विद्युत दिव्यांच्या विविध आकर्षक प्रतिकृती, अक्षर सुलेखन, बोधचिन्हांची रचना, कॉर्पोरेट आॅफि स, निवासी प्रकल्प, इमारतीचे ड्रॉइंग, विविध शोरूम्सच्या प्रतिकृती, क्लब हाऊसच्या विविध संकल्पना मांडल्या आहेत. भित्तिपत्रकांद्वारे रक्तदान, प्लास्टिकमुक्ती, पाणी वाचवा, प्रदूषण टाळा, वृक्षसंवर्धन करा असे विविध समाजप्रबोधनात्मक संदेश दिले आहेत.
या प्रदर्शनातून विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या कौशल्य, नवकल्पनांचे दर्शन घडते. हे प्रदर्शन रविवार (दि. २९) पर्यंत सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत विनामूल्य खुले राहणार आहे.