कोल्हापूर : ‘आरटीई’ अंतर्गत सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षामधील इयत्ता १ ली ची २५ टक्के आरक्षण प्रवेश प्रक्रिया आॅनलाईन पध्दतीने सुरु आहे. या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत पालकांकडून आॅनलाईन अर्ज स्विकारण्यास बुधवार (दि.७) पर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषद (माध्यमिक)चे शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले यांनी शुक्रवारी येथे दिली.वंचित गटातील बालकांना व दुर्बल घटकातील बालकांना प्राथमिक शिक्षणासाठी प्रवेश व अल्पसंख्यांक शाळा वगळता, राज्यातील सर्व विना अनुदानित, कायम विना अनुदानित व स्वयंअर्थसहाय्यता तत्त्वावरील प्राथमिक शाळांना सन २०१२-१३ या शैक्षणिक वर्षापासून शाळेच्या पहिलीच्या वर्गाच्या एकूण विद्यार्थी संख्येपैकी २५ टक्के पर्यंतच्या जागा नजिकच्या परिसरातील वंचित गटाच्या व दुर्बल घटकांतील बालकांच्या प्रवेशासाठी राखून ठेवणे व अशा बालकांना त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण पुरविणे ‘आरटीई’ अंतर्गत बंधनकारक आहे.
या अंतर्गत सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षामधील इयत्ता १ ली ची २५टक्के आरक्षण प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या https://student.maharashtra.gov.in या लिंकवरील RTE Portal वर आॅनलाईन चालू आहे. यासाठी पालकांकडून आॅनलाईन अर्ज स्विकारणेची अंतिम मुदत २८ फेब्रुवारी पर्यंत होती. परंतु पालकांच्या मागणीनुसार बुधवार (दि.७) पर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे.
कालावधीत सामाजिक वंचित घटक, आर्थिक दुर्बल घटक, घटस्फोटीत तसेच विधवा महिला, अनाथ, बालके, दिव्यांग बालके आदी घटकांतील मुलांच्या प्रवेशासाठी पालकांनी वरील लिंकवर अर्ज करावेत, असे आवाहन चौगुले यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
प्रत्येक तालुक्यात मदत केंद्रेप्रत्येक तालुक्यामध्ये मदत केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. RTE Portal वर तसेच तालुका पंचायत समिती शिक्षण विभाग व महानगरपालिका शिक्षण विभागामध्ये मदत केंद्राची माहिती उपलब्ध आहे. तरी आॅनलाईन अर्ज करतेवेळी पालकांना कोणतीही समस्या आल्यास मदत केंद्रांशी संपर्क साधावा किंवा मदत केंद्रावरून आॅनलाईन अर्ज करावेत, असे आवाहनही चौगुले यांनी केले आहे.