कोल्हापूर : येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील (सीपीआर) बदली झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना पूर्ववत आणा व रुग्णसेवेची आठ दिवसांत माहिती द्या, असे खडे बोल आमदार राजेश क्षीरसागर यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांना मंगळवारी सुनावले.यावेळी शिवसेनेतर्फे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या प्रतीकात्मक प्रतिमेस झाडाला लटकवून फाशी देण्यात आली. यावेळी महाजन यांच्याविरोधात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून त्यांचा निषेध केला. यावेळी क्षीरसागर यांनी डॉ. नणंदकर यांना निवेदन दिले.
वैद्यकीय शिक्षण विभागाने खासगी व्यवसायाचा ठपका ठेवून ‘सीपीआर’मधील सात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. या प्रश्नी क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली ‘सीपीआर’च्या प्रवेशद्वारातून मोर्चा काढण्यात आला.यावेळी क्षीरसागर म्हणाले, ‘सीपीआर’मधील वैद्यकीय अधिकारी खासगी व्यवसाय करतात म्हणून वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी त्यांची बदली केली. त्यांतील बदली झालेले काही वैद्यकीय अधिकारी त्यांनी जळगावला नेले. त्यांचा ‘सीपीआर’ बंद पाडण्याचा घाट दिसतो. बदली झालेल्या सात अधिकाऱ्यांपैकी त्यांच्या जागी किती अधिकारी आले, अशी विचारणा क्षीरसागर यांनी डॉ. नणंदकर यांना केली. यावर एक वैद्यकीय अधिकारी आले असून उर्वरित सहा अधिकारी लवकर येतील, असे डॉ. नणंदकर यांनी सांगितले.पुढील आठ दिवसांत, सहा वैद्यकीय अधिकारी रुजू झाले की नाही, याची माहिती मला द्या, असे क्षीरसागर सांगून सीटी स्कॅन, महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना, रक्तपेढी, आदी विभागांतील मनमानीच्या कारभाराविरोधात त्यांनी प्रश्नांचा भडिमार केला. यावेळी महिलांनी महाजन यांचा निषेध केला.मोर्चात जयवंत हारूगले, किशोर घाटगे, पद्माकर कापसे, रणजित जाधव, विशाल देवकुळे, सुनील करंबे, अजित गायकवाड, दीपक गौड, सुनील जाधव, तुकाराम साळोेखे, पूजा भोर, मंगलताई साळोखे, गौरी माळदकर, रूपाली कवाळे, सोनाली पेडणेकर, आदींचा सहभाग होता.