कोल्हापूर : बांधकाम कामगारांची मेडिक्लेम योजना पूर्ववत करा, यासह विविध मागण्यांसाठी संयुक्त बांधकाम कामगार संघटना कृती समितीच्या माध्यमातून बांधकाम कामगारांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला. मागण्यांची पूर्तता १५ दिवसांत झाली नाही तर कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.दुपारी साडेबाराच्या सुमारास दसरा चौक येथून मोर्चाला सुरुवात झाली. ‘मेडिक्लेम योजना पूर्ववत करा...’, ‘बांधकाम कामगारांच्या मागण्या मान्य करा...’ अशा घोषणा देत हा मोर्चा व्हीनस कॉर्नर, बसंत-बहार टॉकीजमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करीत तीव्र निदर्शने करण्यात आली. यानंतर शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.गेली तीन वर्षे बांधकाम कामगारांच्या जिव्हाळ्याची व अत्यंत महत्त्वाची असणारी मेडिक्लेम योजना शासनाने बंद केली आहे. त्यामुळे बांधकाम कामगारांच्या आजारपणात होणारा खर्च व कुटुंबाचा आजाराचा खर्च करणे खूप अडचणीचे आहे; कारण कामगार कामावर गेला तरच एकवेळचे अन्न त्याला मिळू शकते.
ही योजना शासनाने पूर्ववत चालू करावी. तसेच सहायक कामगार आयुक्त कार्यालयाकडे विविध योजनांचे प्रस्ताव धूळ खात पडले आहेत. ते लवकरात लवकर निकाली निघाले पाहिजेत. अशा प्रकारे जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना वाऱ्यावर सोडण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून झाला आहे.
मोर्चातील सर्व मागण्या १५ दिवसांत मान्य झाल्या नाहीत तर कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकरांच्या निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.आंदोलनात संतोष गायकवाड, अभिजित केकरे, राहुल कांबळे, जोतिराम मोरे, लता चव्हाण, आनंदा गुरव, अमोल कुंभार, नीता सुतार, सुजाता चव्हाण, जयश्री सावंत, रूपाली तेजाब, जनाबाई सुतार, चंद्रकला मोरस्कर, अनुसया गुरव, संगीता रेडेकर, सुनीता फगरे, रूपाली डावरे, मंगल सुतार, आदींसह बांधकाम कामगार सहभागी झाले होते.
मागण्या अशा
- - वीटभट्टी कामगारांची नोंदणी चालू करा.
- घराच्या बांधकामासाठी १० लाख रुपये अनुदान मिळावे.
- - ६० वर्षांवरील बांधकाम कामगारांना महिना ३००० रुपये पेन्शन चालू ठेवा.
- - ५००० रुपयांचे सानुग्रह अनुदान सरसकट करा.
- - प्रलंबित योजनांचे लाभ लवकर निकालात काढा.
- - प्रत्येक दिवाळीला सानुग्रह अनुदान नोंदित असलेल्या सर्व बांधकाम कामगारांना द्यावे.
- -बांधकाम कामगारांचे कर्ज माफ करा.
या संघटनांचा सहभाग
- - भारतीय मजदूर संघ
- - विश्वकर्मा कामगार युनियन
- - रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया कामगार युनियन
- - सावित्रीबाई फुले कामगार संघटना
- - श्रमिक कामगार संघटना
- - राष्ट्रीय कॉँग्रेस कामगार संघटना
- - महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटना