कोल्हापूर: बनावट कोटेशनद्वारे दीड कोटीच्या कर्जाची उचल करून फसवणूक केल्याप्रकरणी कोल्हापूर अर्बन बँकेने गोकुळ शिरगावमधील दोघांसह बंगळूरमधील पुरवठादाराविरोधात फिर्याद दिल्याने गोकुळशिरगाव पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल झाला आहे. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसारच कार्यवाही सुरू असून कर्ज देताना जादा तारण घेतले असल्याने बँकेचे काहीही नुकसान होणार नाही, असे अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश चौगुले यांनी सांगितले.कोल्हापूर अर्बन बँकेच्या गांधीनगर शाखेतून गोकुळ शिरगावमधील बाळासाहेब चंद्राप्पा पाटील व आनंदा बाळासाहेब पाटील यांनी नवीन सीएनसी, व्हीसीएमसी मशीन खरेदी करण्यासाठी दीड कोटीचे कर्ज वर्षभरापूर्वी उचलले होते. बँकेनेही मशिनरीसह कर्जदारांची वैयक्तिक प्रॉपर्टी जादा तारण म्हणून आधीच लिहून घेतली आहे. तसेच कर्जदारांकडून कर्ज हफ्त्याची नियमित परतफेडही होत होती. पण मशीन आणून दाखवा, असे बँकेकडून वारंवार सांगून देखील या दोन कर्जदारांकडून वारंवार टाळाटाळ होत होती.
पूर, लॉकडाऊन आदी कारणे दरवेळी दिली जात होती. दरम्यान, शाखाधिकारी गौरव पाटील यांना शंका आल्याने त्यांनी गोकुळ शिरगाव एमआयडीसीमध्ये कर्जदारांनी दिलेल्या कोटेशनप्रमाणे मशीन आहेत का, याची पडताळणी केली, पण त्यांना दोनपैकी एकही मशीन जागेवर आढळून आले नाही. यासंदर्भात त्यांनी बंगळूरमधील पुरवठादार असलेले भरतकुमार जैन यांच्याकडेही चौकशी केली असता, त्यांच्याकडूनही बनावट कोटेशन दिले गेल्याचे स्पष्ट झाले.कर्जदार आणि पुरवठादार या दोघांनी संगनमताने बँकेची फसवणूक केल्याने शाखाधिकारी पाटील यांनीच गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. आता त्याची एक प्रत रिझर्व्ह बँकेकडे पाठवली जाणार आहे, असेही मुख्य कार्यकारी अधिकारी चौगुले यांनी सांगितले.