राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : अडचणीच्या वेळी १००-२०० रुपयांसाठी सावकाराकडे हात पसरण्याच्या काळामध्ये भास्करराव जाधव यांनी ‘कोल्हापूर अर्बन सोसायटी’ची स्थापना केली. सर्वसामान्यांचे हित डोळ्यांसमोर ठेवून क्रांतिकारी निर्णय घेणारे राजर्षी शाहू महाराज ही त्यांची त्यामागे प्रेरणा होती. अनेक उद्योजकांना घडविणारी, अनेकांच्या शिक्षणाला मदत करणारी, अडीअडचणीच्या काळात हक्काची बॅँक म्हणून कार्यरत राहिलेल्या या कोल्हापूर अर्बन बॅँकेला १०५ वर्षे पूर्ण झाली आहेत. ब्रिटिशकाळात स्थापन झालेल्या या संस्थेने केवळ आणि केवळ एका आदर्श कार्यप्रणालीतून कोल्हापूरच्या सहकारी बँकिंग क्षेत्रात आपला स्वतंत्र ब्रॅँड तयार केला आहे. ‘कोल्हापूर अर्बन’ म्हटले की चांगली बँक हा विश्वास सभासदांत निर्माण करण्यात ही बँक यशस्वी झाली आहे. सहकाराबद्दल फारसे चांगले बोलले जात नसताना या बँकेने जपलेली पारदर्शकता नक्कीच आदर्शभूत आहे.कोणतीही संस्था प्रभावीपणे व चिरंतन काळ उभी राहते ती तिला मिळालेल्या व लाभलेल्या सक्षम नेतृत्वामुळेच. हे नेतृत्व केवळ वैचारिक व मोठ्या नावाचे असावे असे नाही; पण ते नि:स्वार्थी व निर्लोभ, ध्येयवादी, प्रामाणिक, शिस्तबद्ध, कार्यपिपासू, वक्तशीर व व्यावहारिकही असायला पाहिजे; तर त्या संस्थेच्या कार्याचा वटवृक्ष होतो. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात व विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात सावकारकीने थैमान घातले होते. त्याकाळी असलेल्या बॅँका सामान्य माणसाला दारातही उभे करून घेत नव्हत्या. त्यामुळे सावकारांकडून १२ ते ३० टक्क्यांपर्यंत व्याजाने कर्ज घ्यावे लागत असल्याने सामान्य माणसाला कर्जाच्या बोजातून मान वर काढता येत नव्हती. सर्वसामान्यांची उन्नती व्हायची झाल्यास त्यांना सुलभ कर्जपुरवठा व्हायला पाहिजे. आर्थिक संपन्नता औद्योगिकीकरणावर अवलंबून असते. लोकांनी एकत्र येऊन साखर कारखाने, सहकारी संस्था उभ्या राहिल्या तरच सामान्य माणूस उभा राहू शकतो, याची जाणीव राजर्षी शाहू महाराजांना झाली आणि त्यांनी सहकाराला मदत करण्याची भूमिका घेतली. भास्करराव जाधव हे उच्चविद्याविभूषित होते. ते नगरपरिषदेचे प्रशासक असल्याने त्यांच्यावर राजर्षी शाहू महाराजांनी जबाबदारी सोपविली. त्यातूनच जाधव यांनी पुण्यशील महाराणी व्हिक्टोरिया यांच्या जन्मदिनी २४ मे १९१३ ला दि कोल्हापूर अर्बन को-आॅप. सोसायटी’ची स्थापना केली. त्याकाळी वर्णव्यवस्थेचा पगडा असतानाही तो झुगारून जाधव यांनी कोल्हापूर नगरपालिकेच्या इमारतीत संस्थेची सुरुवात केली. पण, ही जागा सोडावी लागल्यानंतर गंगावेश येथील जागेत इमारत उभी करण्याचा निर्णय झाला. तिचे उद्घाटन ३ जून १९२३ रोजी छत्रपती राजाराम महाराज यांच्या हस्ते झाले आणि संस्थेने मागे वळून पाहिलेच नाही.संचालकांची सचोटी आणि कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा या बळावर बॅँकेने आठ हजारांच्या ठेवींवरून आज ७५४ कोटींपर्यंत मजल मारली. बॅँकेची घोडदौड सुरू असताना सामाजिक बांधीलकी जोपासत समाजातील विविध उपक्रमांत सहभाग घेतला जात आहे.सरकारच्या आर्थिक धोरणाचा फटका अनेक वेळा बॅँकेला बसला. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे अनेक सक्षम बॅँका डबघाईला आल्या; पण राजर्षी शाहू महाराजांची प्रेरणा आणि भास्करराव जाधव यांनी घालून दिलेल्या शिस्तीने ‘कोल्हापूर अर्बन बॅँक’ कधीच डगमगली नाही. आर्थिक शिस्तीच्या बळावर बॅँकेने राज्यातील सहकार क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला आहे. राज्य सरकारसह सहकारात काम करणाºया अनेक संस्थांनी बॅँकेला विविध पुरस्कारांनी गौरवले आहे. १९ शाखांच्या माध्यमातून लाखो ग्राहकांचे जाळे विणले आहे. बॅँकेच्या वतीने विविध बारा योजना सुरू असून, त्यांच्या माध्यमातून समाजातील दुर्बल घटकाचा आर्थिक स्तर उंचावण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे. व्यवसाय वृद्धीकडे संचालक व कर्मचाºयांची नजर असतेच; पण ग्राहक व सभासदांशी असलेली नम्रता निश्चितच वाखाणण्यासारखी आहे. बँकेचे सध्या उमेश निगडे हे अध्यक्ष व राजन भोसले उपाध्यक्ष आहेत. संचालक मंडळात ज्येष्ठ संचालक शिवाजीराव कदम, यशवंतराव साळोखे, शिरीष कणेरकर, नामदेवराव कांबळे, बाबासाहेब मांगुरे, विश्वासराव काटकर, सुभाष भांबुरे, जयसिंगराव माने, मधुसूदन सावंत, रवींद्र धर्माधिकारी, पी. टी. पाटील, सुमित्रा शामराव शिंदे, केदार कुंभोजकर, आब्बाराव देशमुख व सीईओ म्हणून सुभाष कुत्ते काम पाहत आहेत.कोल्हापुरात शतकाहून अधिक वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या अनेक संस्था आहेत. त्या सहकार तसेच सांस्कृतिक क्षेत्रात आहेत. वाचनालये आहेत तशा तालीम संस्थाही आहेत. समाजाच्या विकासात मोठे योगदान देणाºया अशा संस्थांच्या वाटचालीचा आलेख आजपासून दर सोमवारी ‘शंभर नंबरी’ या सदरातून मांडणार आहोत.बॅँकेचे प्रवर्तक मंडळमुख्य प्रवर्तक : भास्करराव जाधव, प्रवर्तक : अण्णा भंगी, जुमन भंगी, आप्पा बागवान, हसन रहिमतपूरकर, बाळा कुंभार, कानू मेस्त्री, गोविंद साळोखे, मारुती चव्हाण, बाळकृष्ण पंडित, गोविंद कुलकर्णी.शाहूंचे द्रष्टेपणराजर्षी शाहू महाराजांचे द्रष्टेपण या बॅँकेच्या स्थापनेतही दिसते. त्यांनी १९१३ ला या बँकेचा पाया घातला. त्यानंतर शंभर वर्षांनी ‘युनो’ने २०१३ हे ‘आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष’ म्हणून जाहीर केले. म्हणजे जगाला कळण्याआधी तब्बल एक शतक अगोदरच शाहू महाराजांना सहकाराचे महत्त्व समजले होते. समाजाच्या उत्थानाचा तोच एक चांगला मार्ग आहे, अशी त्यांची धारणा होती.अडचणीची वीस वर्षे : बॅँकेच्या वाटचालीत १९३० ते १९५० हा वीस वर्षांचा काळ फारच खडतर गेला. प्लेगची साथ, संचालक मंडळातील अंतर्गत गटबाजी आणि संघर्षामुळे थकबाकीचे प्रमाण वाढत गेले. त्यावेळी सुपरवायझिंग कमिटीने अंगावरील कर्जे देऊ नयेत. परतफेडीची पात्रता तपासूनच कर्जे द्यावीत, अशी सूचना केली. ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी १९५१-५२ मध्ये द. न. कणेरकर, अण्णाप्पा पाडळकर, शंकरराव चौगुले यांसारख्या नि:स्वार्थी लोकांनी कंबर कसली आणि बॅँकेची भरभराट सुरू झाली.
‘कोल्हापूर अर्बन’ सहकारी बँकिंगचा ‘ब्रॅँडनेम’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 1:08 AM