कोल्हापूर : करवीरनिवासिनी कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमणुकीसंदर्भात कायदा होऊनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे या नेमणुका त्वरित व्हाव्यात, यासह विविध मागण्यांचे निवेदन पुजारी हटाव संघर्ष समितीचे सदस्य शरद तांबट यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना दिले.राज्य शासनाने ‘अंबाबाई मंदिर ट्रस्ट, करवीर निवासिनी मंदिर’ संदर्भातील कायदा राज्यपालांच्या सहीने केला आहे. त्याची त्वरित अंमलबजावणी होऊन पगारी पुजारी तातडीने नेमले जावेत. त्याचबरोबर मंदिराच्या आराखड्यासाठी प्रशासकाची नेमणूक करून हा आराखडा पूर्णत्वास न्यावा. तसेच अंबाबाई मंदिर पुजारीमुक्त व राजकारणमुक्त करावे, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. कायदा होऊन सहा महिने झाले तरी त्याची अंमलबजावणी न करता चालढकल केली जात आहे.
या गंभीर प्रकाराकडे जिल्हाधिकाºयांनी स्वत: लक्ष द्यावे. त्यामुळे निधीचा गैरवापर होऊ नये. वर्षानुवर्षे असलेली अतिक्रमणे काढावीत, रस्ता रुंदीकरण, धर्मशाळा, सक्षम वाहतूक पार्किंग सुविधा, आदी कोट्यवधीची कामे प्रशासकामार्फत पूर्ण करावीत, असेही या निवेदनात म्हटले आहे.