कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या रस्ते बांधकामामध्ये यापुढे ८ टक्के प्लास्टिक मटेरियल वापरण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी दिली. त्याचीच पूर्वतयारी म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात ज्या ठिकाणी प्लास्टिक मोठ्या प्रमाणावर गोळा होते अशा ठिकाणी प्लास्टिकवर प्रक्रिया करणारे प्रकल्प उभारणार असल्याचे ते म्हणाले.पंचगंगा प्रदूषण, स्वनिधीचा वापर आणि अन्य अनुषंगिक बाबींबाबत पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, इंडियन रोड काँग्रेसने अशा पद्धतीने रस्ते बांधकामामध्ये प्लास्टिकचा ८ ते १० टक्के वापर करण्याची सूचना केली आहे.
एकीकडे प्लास्टिकवर बंदी येत असताना दुसरीकडे आहे त्या प्लास्टिकचे निर्मूलन हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणूनच ४० लाख रुपये खर्चून अशा पद्धतीने रस्ते बनविण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे.यामध्ये प्लास्टिकची पावडर तयार करण्यात येईल. रस्ते खडीकरण झाल्यानंतर त्यावर ही पावडर टाकून डांबरीकरण करण्यात येईल. प्लास्टिक लवकर नष्ट होत नाही. या गुणधर्माचा फायदा होऊन हे रस्ते टिकाऊ होतील. यासाठी यापुढे अशा पद्धतीने रस्ते बांधणी करण्यात येणार आहे.पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी काही कंपन्या आम्हाला मदत करायला तयार आहेत. मात्र, त्याआधी जिल्हा परिषदेने यासाठी काय योगदान दिले, अशी विचारणा होते तेव्हा आम्ही केंद्र, राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर केल्याचे सांगतो. तो मंजूर झाल्यानंतर आम्ही कार्यवाही करणार असल्याचे सांगतो; परंतु एवढ्या प्रचंड कामासाठी किमान जिल्हा परिषदेने थोडा निधी लावून काम सुरू करावे, या भूमिकेतून स्वनिधीतून निधी लावण्यात आला आहे.मोठे काम पूर्ण करण्यासाठी सुरुवातीला छोटी पावले उचलावी लागतात. त्यामुळेच ज्या ठिकाणी थेट सांडपाणी नदीत मिसळते तेथे बंधारे घालून ते पाणी अडवण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे, असे अमन मित्तल यांनी सांगितले.