कोल्हापूर : सुट्टीची धम्माल करत १०० शालेय मुला-मुलींनी दोन दिवसीय सहलीत रविवारी (11 नोव्हेंबर) पन्हाळगडावर पक्षी निरीक्षण, निसर्ग निरीक्षण, किल्ल्यावरील ऐतिहासिक स्थलांच्या दर्शनासह ग्रामीण जीवन आणि पारंपारिक खेळ अनुभवले. हिलरायडर्स फाउंडेशन, संवेदना सोशल फाउंडेशन आणि कुतुहल फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रेरणा आणि प्रोत्साहनातून ही सुट्टीची धम्माल, मामाच्या गावाला जाऊया, आठवणीतील खेळ खेळुया या संकल्पनेतुन ही सहल आयोजित केली आहे.
पन्हाळगडावर सैनिकी मुलांच्या वसतिगृहात विविध खेळांचा मुलांनी आनंद घेतला. हिलरायडर्स फाउंडेशनचे अध्यक्ष प्रमोद पाटील, कुतुहल फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन जिल्हेदार, आनंद आगळगावकर तसेच निसर्गमित्रचे अनिल चौगुले यांनी हे खेळ घेतले. यावेळी अनेक पालकांनीही या खेळाचा लाभ घेतला.
दोन-दोन दिवसांच्या सहलींचे आयोजन कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात करण्यात आले आहे. सुट्टीची धम्माल, मामाच्या गावाला जाऊया, आठवणीतील खेळ खेळुया ही संकल्पना आहे. निसर्ग, वारसास्थळांच्या दर्शनासह ग्रामीण जीवन विशेषत: गुऱ्हाळधर, ग्रामीण चालीरिती, संस्कृतीसह पारंपारिक व निसर्ग खेळ यामध्ये प्रामुख्याने विठीदांडू, लगोरी, गोटया , बिट्या अशा अनेक खेळांचा अनुभवही मुलांबरोबर मुलींनीही घेतला.
मुलांना टीव्ही, मोबाईल आणि संगणकातून बाहेर काढून निसर्गाच्या सानिध्यात ग्रामीण जीवनाबरोबर गडकिल्यांची माहिती मुलांनी या सहलीच्या निमित्ताने घेतली. दोन दिवसांच्या मोफत सहलीचे भरगच्च नियोजन अनिल चौगुले यांनी केले.पन्हाळा येथे शनिवारी संध्याकाळी टेलिस्कोपव्दारे मुलांनी आकाश निरिक्षण केले. पन्हाळा येथील करवीर संस्थापिका महाराणी ताराबाईनी वास्तव्य केलेल्या ताराराणी राजवाडयात मुक्काम केला. रविवारी सकाळी पन्हाळा निसर्गनिरिक्षण, पक्षीनिरिक्षण, गडदर्शन, निसर्गदर्शनानंतर विठीदांडू, लगोरी, गोटया अशा अनेक पारंपारिक तसेच निसर्ग खेळांचा अनुभव घेतला.