कोल्हापूर : महानगरपालिका आरोग्य विभागातर्फे शहर हद्दीत सुरू असलेल्या गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत एकूण १ लाख १७ हजार ५०२ इतक्या पात्र लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले असून, यापुढे महानगरपालिकेच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात मुलांना लसीकरण केले जाणार असल्याने पालकांनी या केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी केले आहे.गोवर हा अत्यंत संक्रमक आणि घातक आजार असून तो मुख्यत: मुलांना होतो. गोवर आजार जास्त बळावल्यास मृत्यू होऊ शकतो. रुबेला हा त्या मानाने सौम्य संक्रमक आजार असून तो मुलांना तसेच प्रौढ व्यक्तींनाही होतो.
परंतु जर गर्भवती स्त्रियांना रुबेला या आजाराचा संसर्ग झाला तर अचानक गर्भपात किंवा गर्भात जन्मजात दोष होऊ शकतो. हे बालक जन्मजात रुबेला सिंड्रोम पीडित म्हणून ओळखले जाते. असे बालक त्या महिलेच्या कुटुंबासाठीच नव्हे तर समाजासाठीसुद्धा ओझे लादल्यासारखे असते.त्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये ११ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत २७ नोव्हेंबरपासून गोवर रुबेला लसीकरण मोहिमेअंतर्गत नऊ महिने ते १५ वर्षे वयोगटातील सर्व मुला-मुलींना लसीकरण करण्यात येत आहे.
या मोहिमेअंतर्गत आजअखेर कोल्हापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील एकूण १ लाख १७ हजार ५०२ इतक्या पात्र लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले असून, सदर लस मोफत उपलब्ध आहे.ज्यांनी अद्यापही मुला-मुलींचे गोवर रुबेला लसीकरण केले नसेल त्यांनी नजीकच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधून लस घेऊन या कार्यक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका आरोग्य विभागामार्फत डॉ. पाटील यांनी केले आहे.