कोल्हापूर : इंडोनेशिया येथे होणाऱ्या २०२२ आशियाई रग्बी सेव्हन एस या स्पर्धेसाठी कोल्हापूरच्या वैष्णवी दत्तात्रय पाटील हिची भारतीय वरिष्ठ गट महिला संघामध्ये निवड झाली. वैष्णवी पाडळी खुर्द (ता. करवीर) येथील असून तिचे वडील रिक्षाचालक आहेत.जकार्ता येथे ७ ते ९ ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या या रग्बी स्पर्धेमध्ये भारतीय महिला संघाबरोबर इंडोनेशिया, सिंगापूर,नेपाळ , युएई, घुम, उजबीकिस्तान, मंगोलिया या देशांमधील महिला संघ सहभागी होत आहेत. भारतीय महिला संघाचा सराव एक महिनाभरापूर्वी भुवनेश्वर येथे पार पडला. सध्या संघाचा सराव बँकॉक येथे दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक लुध्वीक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.वैष्णवी सध्या न्यू कॉलेजमध्ये कला शाखेच्या पहिल्या वर्गात शिकत आहे. या अगोदर वैष्णवीने उजबेकिस्तान येथे झालेल्या १८ वर्षांखालील आंतरराष्ट्रीय आशियाई रग्बी स्पर्धेत भारतीय संघातून प्रतिनिधित्व करत असताना द्वितीय क्रमांक पटकावला होता. तिला रग्बी इंडियाचे अध्यक्ष राहुल बोस, सीईओ नासिर हुसेन, सहसचिव संदीप मोसमकर, भारतीय संघाची कर्णधार वहाबीज भारूचा, मीनाल पास्ता, मालोजीराजे, मधुरिमाराजे छत्रपती, जिल्हा असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. अमर सासणे, उपाध्यक्ष प्रकाश पाटील,अजित पाटील व प्रशिक्षक दीपक पाटील यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.लहानपणापासूनच चमकदार कामगिरीलहानपणापासून फूटबाॅल, रग्बी खेळाची आवड आहे. शालेय जीवनातच चमकदार कामगिरी केली. त्यामुळे पुढे गर्ल्स हायस्कूलमध्ये तिच्या खेळाला अधिक चालना मिळाली. त्यानंतर न्यू काॅलेजमध्ये तिच्या खेळाला खऱ्या अर्थाने बहर आला. दीपक पाटील, सासने सरांमुळे तिच्या खेळाला आणखी धार आली. जिल्हा, राज्य, राष्ट्रीय असे टप्पे करीत ती आता भारतीय संघात पोहचली आहे.रोज सकाळी ६ ते ९ पर्यंत ती सराव करते. खेळातही जिंकण्याच्या इराद्याने ती उतरते. यापुढेही देशाचे नाव सातासमुद्रापार करून कोल्हापूरचा विजयी पताका कायम फडकत ठेवावा. एवढीच आमची अपेक्षा आहे अशी भावना वडील दत्तात्रय पाटील यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केली.
रिक्षाचालकाच्या लेकीची चमकदार कामगिरी, वैष्णवी पाटील हिची भारतीय रग्बी संघात निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 2:18 PM