कोल्हापूर : कराटे या खेळाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी चाणक्य मार्शल आर्टस् बहुउद्देशीय संस्थेचा खेळाडू वीर सोमनाथ मगर हा सलग बारा तास स्ट्रेचिंग करणार आहे. शुक्रवारी (दि. ५ आॅक्टोबर) भवानी मंडप येथे हा उपक्रम होणार असून या उपक्रमाची नोंद वर्ल्ड रेकार्ड आॅफ इंडियामध्ये केली जाणार आहे, अशी माहिती प्रशिक्षक संदीप लाड व सोमनाथ मगर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सोमनाथ मगर म्हणाले, माझा मुलगा वीर चार वर्षांपासून कराटे प्रशिक्षण घेत आहे. मार्शल आर्टमधील कराटे हा मुख्य प्रकार आहे. मूळचा भारतीय पण सध्या या खेळावर जपानचे अधिराज्य आहे. कराटे या खेळाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी वीरने आपल्या वाढदिवसासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे.
संदीप लाड म्हणाले, वयाच्या आठव्या वर्षी वीर हा उपक्रम करत आहे. भवानी मंडप येथे शुक्रवारी सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंत सलग बारा तास स्ट्रेचिंग करून वर्ल्ड रेकॉर्ड आॅफ इंडिया, ग्लोबल रेकॉर्ड रिसर्च अँड फौंडेशनमध्ये नोंद केली जाणार आहे. तसेच लिम्का बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी हा उपक्रम सादर केला जाणार आहे. वीरची या उपक्रमासाठी तयारी सुरू आहे. तरी त्याला प्रोत्साहन देण्यासाठी नागरिकांनी व खेळाडूंनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले. याप्रसंगी शारदा मगर, प्रसाद जाधव, वीरेंद्र सावंत, उदय लाड, राजेश पाटील, अॅड. रण्ािजत घाटगे, आदी उपस्थित होते.