कोल्हापूर : मतदार यादीतील वगळण्यात आलेली नावे कोणत्या आधारे वगळली; त्यासाठी कोणते निकष लावले, काय पुरावे घेतले? अशी इत्थंभूत माहिती घेत पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी गुरुवारी सकाळी करवीर प्रांताधिकारी कार्यालयात करवीर, कोल्हापूर दक्षिण व कोल्हापूर उत्तर या मतदारसंघातील याद्यांची पडताळणी केली.मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत डॉ. म्हैसेकर यांनी प्रांताधिकारी कार्यालयाला भेट दिली. यावेळी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय श्ािंदे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहल भोसले, करवीर प्रांताधिकारी सचिन इथापे, आदी उपस्थित होते.सकाळी दहाच्या सुमारास डॉ. म्हैसेकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील करवीर प्रांताधिकारी कार्यालय येथे भेट दिली. यावेळी म्हैसेकर यांनी मतदार यादीतून वगळण्यात आलेली नावे कशाच्या आधारे कमी झाली, याबाबत विचारणा केली. त्याकरिता कोणकोणते निकष लावले व कोणते पुरावे घेतले याची माहितीही त्यांनी घेतली.
सुमारे दोन तास त्यांनी या ठिकाणी थांबून यादीसंदर्भात इत्थंभूत माहिती घेतली. नवमतदारांबरोबरच दिव्यांग व तृतीयपंथी यांचे मतदार वाढविण्यावर भर द्यावा, अशा सूचना त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.त्याचबरोबर विमानतळ विस्तारीकरण, विविध धरण प्रकल्प, राष्ट्रीय महामार्ग, आदींसाठी संपादित केलेल्या जमिनीचे पैसे लाभार्थ्यांना दिले जात आहेत का, याची विचारणाही यावेळी करण्यात आली. यावर उपलब्धतेनुसार संबंधितांना पैसे दिले जात असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.