कोल्हापूर : ताराबाई पार्कात ईएसआयसीच्या नावाने तब्बल २0 वर्षांपासून उभ्या राहिलेल्या इमारतीच्या सांगाड्यात जीव भरला आणि आरोग्य सुविधांसाठी पदरमोड करणाऱ्या जिल्ह्यातील सव्वालाख कामगारांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या. पहिल्याच दिवशी ७ ओपीडीमधून ३५ कामगार रुग्णांनी आरोग्य सुविधेचा लाभ घेतला.कामगारांना आरोग्य सुविधा मिळाव्यात या उद्देशाने १९९७ मध्ये १३ कोटी रुपये खर्चून १00 खाटांचे रुग्णालय उभारण्यात आले. सुसज्ज इमारत उभी राहिली; पण विविध कारणामुळे गेली २0 वर्षे प्रत्यक्षात उपचार सुरू होऊ शकले नाहीत.
हॉस्पिटल सुरू करण्यासाठी तीनवेळा दुरुस्तीही केली गेली; पण प्रत्यक्षात एकही ओपीडी सुरू होऊ शकली नाही. कामगार संघटनांनी वारंवार रस्त्यावर उतरून आवाज उठवला, पण परिस्थितीत फरक पडला नाही. अखेर लोकप्रतिनिधी आणि कामगार संघटनांच्या अथक प्रयत्नांना यश आले आणि मंगळवार (१६ आॅक्टोबर)पासून हॉस्पिटल सुरू झाले.अजून अधिकृत उद्घाटन व्हायचे असले तरी ११ पैकी ७ ओपीडी सुरू झाल्या. दुपारी जेवणाची सुट्टी वगळता सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत या ओपीडी सुरू राहिल्या. पहिलाच दिवस असल्याने प्रतिसाद कमी असलातरी दिवसभरात ३५ कामगारांना तपासून औषधेही देण्यात आली. कान, नाक, घसा, डोळे, सर्जरी, मेडिसीन, स्त्रीरोग, बालरोग या विभागांतील ओपीडीत डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करून औषधे दिली.हॉस्पिटलचे वैशिष्ट्य
- खाटा १00
- ओपीडी ७
- तज्ज्ञ डॉक्टर १0
- इतर स्टाफ ४0
हॉस्पिटल नीट चालवावे अन्यथा आमच्याशी गाठ हॉस्पिटल सुरू झाल्याने कामगारांच्या बऱ्याच वर्षांपासूनच्या संघर्षाला फळ आले आहे. खासगीकरण टाळण्यात कामगार यशस्वी झाले असून, या प्रक्रियेला हातभार लागलेल्या सर्वांचा आभारी आहे. हॉस्पिटल सुरू झाले, आता सुविधा वाढवाव्यात, ते नीट चालवावे अन्यथा आमच्याशी गाठ असणार आहे.अतुल दिघे,कामगार संघटना नेते
आकस्मिक विभाग लवकरच सुरू होईल अजून फारशी प्रसिद्धी झाली नसल्याने प्रतिसाद कमी असला तरी ईएसआयसी हॉस्पिटलमध्ये अंतर्भूत होणाºया कामगारांच्या व्यवस्थापनाशी पत्रव्यवहार केला आहे. आता ७ ओपीडी सुरू झाल्या असून, उर्वरित लवकरच पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहेत. औषधांचा पुरेसा साठाही आहे. आकस्मिक विभाग तातडीने सुरू करण्याला आमचे प्राधान्य राहणार आहे.दुष्यंत खेडीकर, वैद्यकीय अधीक्षक, ईएसआयसी हॉस्पिटल.