कोल्हापूर : मिस्टर गे इंडिया आणि मिस्ट एलजीबीटी यांच्यातर्फे आयोजित केलेल्या ‘मिस्टर गे इंडिया’ या स्पर्धेच्या अंतिम फेरीत कोल्हापूरच्या विशाल पिंजानीने बाजी मारली. विशाल आता साउथ आफ्रिकेतील केपटाउन येथे होणाऱ्या ‘मिस्टर वर्ल्ड गे’ या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.पुण्यात ५ ऑक्टोबरला झालेल्या रंगारंग सोहळ्यात कोल्हापूर आणि परिसरात एलजीबीटीक्यूआयएप्लस समुदायासाठी ‘अभिमान’ या स्वयंसहाय्यता गटाद्वारे कार्य करणाऱ्या विशालला सर्व परीक्षकांनी पहिली पसंती दिली. या अंतिम सोहळ्यात समलिंगी पुरुषांचे सामाजिक-सांस्कृतिक संघर्षाला सामोरे जात आत्मविश्वासपूर्वक घडवलेल्या व्यक्तिमत्त्वाचे मोहक रूप, सहानुभाव, सर्वसमावेशकता याचे अनोखे दर्शन घडले. समलिंगी पुरुषांसाठीच्या या स्पर्धेत शारीरिक तंदुरुस्ती, रुबाबदार व्यक्तिमत्त्व, बुद्धिमत्ता, हजरजबाबीपणा सोबतच एलजीबीटीक्यूआयएप्लस समुदायासाठी केलेले सामाजिक कार्य हे निकष होते. भारताच्या विविध प्रांतातून सहभागी झालेल्या स्पर्धकांतून निवडक स्पर्धक अंतिम फेरीत पोहोचले. विशाल एकेक फेरी पार करत अंतिम फेरीत पोहोचला. परीक्षकांचे गुण आणि वेबसाइटद्वारे लोकांनी दिलेली मते विचारात घेऊन अंतिम निकाल दिला गेला. समलिंगी असल्याचं जाहीरपणे सांगणारे राजपिपळा संस्थानाचे राजपुत्र मानवेंद्र सिंह गोहिल यांच्या हस्ते विशालला मिस्टर गे इंडियाचा किताब देण्यात आला.विशालमध्ये लहानपणापासून समलैगिकतेची भावना होत्या. अकरावी आणि बारावीला असताना मित्रांनी हिंसा केल्यामुळे शिक्षण सोडले. समलैगिक असलेल्या काही मित्रांनी हा त्रास सहन न झाल्याने आत्महत्या केल्या. तेव्हा या चुकीच्या समजाविषयी माहिती घेतली. जागतिक आरोग्य संघटनेने हा आजार नसून ती एक नैसर्गिक भावना असल्याचे जाहीर केल्यानंतर घरच्यांनी स्वीकारले. आज राजारामपुरी येथील ग्रंथ वर्ल्ड त्याच्या मालकीचे आहे. अभिमान या संस्थेच्या माध्यमातून तो २०१७ पासून कोल्हापूर जिल्ह्यात काम करतो आहे.
कोल्हापूरचा विशाल पिंजानी ठरला ‘मिस्टर गे इंडिया’; ‘मिस्टर वर्ल्ड गे’ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2023 11:15 AM