- उद्धव गोडसेकोल्हापूर : महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलच्या अध्यक्षपदी कोल्हापुरातील ज्येष्ठ वकील विवेक घाटगे यांची, तर मुंबईतील ॲड. उदय वारुंजीकर यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. बार काउन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य जयंत जयभावे यांच्या उपस्थितीत रविवारी (दि. १८) कोल्हापुरात झालेल्या विशेष सभेत निवड प्रक्रिया पार पडली. घाटगे यांच्या निवडीमुळे कोल्हापुरातील खंडपीठाच्या मागणीला बळ मिळणार आहे.
महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलच्या विशेष सभेचे आयोजन कोल्हापुरात करण्यात आले होते. या सभेत नूतन पदाधिका-यांची निवड झाली. अध्यक्षपदी विवेक घाटगे, तर उपाध्यक्षपदी उदय वारुंजीकर यांची एकमताने निवड झाली. ॲड. घाटगे यांनी मावळते अध्यक्ष मिलिंद पाटील यांच्याकडून कार्यभार स्वीकारला. यावेळी बोलताना ॲड. घाटगे म्हणाले, 'बार काउन्सिलच्या अध्यक्षपदाची धुरा सोपवल्याचा कार्यकारिणीचा विश्वास सार्थ ठरेल असे काम करू.' उपाध्यक्ष ॲड. वारुंजीकर यांनीही मनोगत व्यक्त करताना बार काउन्सिलचे काम दोन्ही राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पोहोचवण्याची ग्वाही दिली.
विशेष सभेसाठी मावळते अध्यक्ष मिलिंद पाटील (उस्मानाबाद), मावळते उपाध्यक्ष संग्राम देसाई (सिंधुदुर्ग), हर्षद निंबाळकर, राजेंद्र उमापकर (पुणे), असिफ कुरेशी, पारिजात पांडे (नागपूर), आशिष देशमुख (हंगोली), वसंतराव भोसले (सातारा), सुभाष घाडगे, विठ्ठल धोंडे-देशमुख (मुंबई), मिलिंद थोबडे (सोलापूर) आणि गजानन चव्हाण (ठाणे) यांच्यासह १६ कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. जिल्हा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष प्रकाश मोरे, प्रशांत चिटणीस यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि ज्येष्ठ वकील उपस्थित होते.
या कामांना प्राधान्यमहाराष्ट्र आणि गोव्यात ई-फायलिंग प्रोजेक्टसाठी आवश्यक सुविधांची पूर्तता करणे आणि कोल्हापुरातील खंडपीठाचा प्रश्न मार्गी लावण्याच्या कामाला प्राधान्य देणार असल्याचे काउन्सिलचे नूतन अध्यक्ष घाटगे यांनी सांगितले.
आडगुळेंनंतर घाटगेंना संधीज्येष्ठ वकील महादेवराव आडगुळे यांनी १९९९ मध्ये काउन्सिलच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती. त्यानंतर २४ वर्षांनी ॲड. घाटगेंच्या निवडीच्या निमित्ताने कोल्हापूरला अध्यक्षपदाची संधी मिळाली. घाटगे यांनी यापूर्वी दोनवेळा जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्षपद सांभाळले. तसेच काउन्सिलच्या वेलफेअर समितीचे अध्यक्ष आणि काउन्सिलच्या उपाध्यक्षपदीही त्यांची निवड झाली होती.