कोल्हापूर : गेल्या आठ दिवसाच्या कडकडीत लॉकडाऊनमुळे घरात थांबलेली जनता ‘अनलॉक’ला सुरूवात होताच सोमवारी रस्त्यावर आली. त्यामुळे शहरातील खरेदीची लगबग वाढली. बाजारपेठा फुलल्या, रस्ते गजबजले. लॉकडाऊनमधील उदास, निर्मनुष्य रस्त्यांना जिवंतपणा आला. बाजारपेठेतून नागरिकांची मोठी गर्दी उसळली खरी, परंतु या गर्दीवर पोलीस व महानगरपालिका कर्मचाऱ्यांना योग्य प्रकारे नियंत्रण ठेवण्यात यश आले.
शहरात दि. १४ एप्रिलच्या रात्रीपासून सुरु झालेल्या लॉकडाऊनच्या काळात सकाळी सात ते अकरा या वेळेत अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्याची परवानगी होती. रुग्णांची संख्या वाढतच राहिल्याने अखेर १५ मे च्या रात्री बारा वाजल्यापासून कडकडीत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यामुळे गेल्या आठ दिवसापासून शहरातील संपूर्ण जनता घरात बसून होती. सोमवारपासून पुन्हा सकाळी सात ते अकरा अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.
कडकडीत लॉकडाऊन संपताच सोमवारी सकाळी मात्र नागरिकांनी खरेदीच्या निमित्ताने रस्त्यावर प्रचंड गर्दी केली. सकाळी सात वाजताच अत्यावश्यक सेवेतील सर्व दुकाने उघडली गेली. त्यामुळे रस्ते नागरिकांच्या तसेच वाहनांच्या गर्दीने फुलले. शहरातील चौक अन् रस्ते गजबजून गेले. वातावरणातील गोंगाट सुरु झाला. सकाळी अकरा वाजेपर्यंत तर ही गर्दी हटता हटली नाही. शहरात सगळीकडे रांगाच रांगा लागलेल्या पहायला मिळाल्या.
शहरातील बाजारगेट, कपिलतीर्थ, ताराबाई रोड, पंचगंगा घाट, पाडळकर मार्केट, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी बी. टी. कॉलेज, राजारामपुरी, धैर्यप्रसाद हॉल चौक, कसबा बावडा, शिंगोशी मार्केट, सानेगुरुजी वसाहत, आपटेनगर, क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, कळंबा, रामानंदनगर या परिसरात भरलेल्या भाजी मंडईतून नागरिकांची मोठी गर्दी उसळली. याशिवाय विविध भागात असलेल्या किराणा मालाची दुकाने, बेकरी, खाद्यपदार्थांची दुकाने, नास्ता सेंटर, चहाच्या टपऱ्या, धान्याची दुकाने, पेट्रोलपंप सुरु झाले. प्रत्येक ठिकाणी गर्दी, रांगा असेच चित्र होते.
कडकडीत लॉकडाऊनमुळे बंद असलेल्या राष्ट्रीयीकृत, सहकारी बँका, पतसंस्था, वित्तीय संस्था यांचे व्यवहार देखील सुरु झाले. प्रत्येक ठिकाणी ग्राहकांच्या रांगा होत्या, काही बँकांनी नागरिकांना थेट प्रवेश दिला नाही, त्यामुळे या रांगा रस्त्यावर आल्या होत्या. पेट्रोल पंप सुरु असले तरी नागरिक रस्त्यावर नसल्यामुळे तेथील कामकाज संथ होते, सोमवारी मात्र पेट्रोल घेण्याकरिता ही गर्दी उसळली होती.
-गर्दीवर पाेलीस, महापालिकेचे नियंत्रण-
भाजी मंडईत होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन पोलीस व महापालिका कर्मचाऱ्यांनी विक्रेत्यांना मंडईत न बसता मुख्य रस्त्यावर आणून बसविले होते. मंडईकडे जाणारे रस्ते तर बॅरिकेट लावून बंद केले होते. विशेषतः लक्ष्मीपुरीतील धान्य बाजार, भाजी मंडईकडे जाणारे सर्व रस्ते बंद केले होते. नागरिकांना फक्त पायी चालत जाऊ दिले जात होते. वाहने आत सोडली जात नव्हती. त्यामुळे तेथील गर्दीवर पूर्ण नियंत्रण राहिले. अशाच प्रकारे अन्य ठिकाणीही गर्दीवर नियंत्रण राखण्यात पोलिसांनी यश मिळविले. ज्या त्या पोलीस ठाण्यातील पोलिसांसह शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी याकामी अतिशय चोख भूमिका बजावली.
- शाहूपुरीत मोठी गर्दी-
शाहूपुरी पाच बंगला येथील मंडई पाच बंगला ते बागल चौक दरम्यान भरविण्यात आली होती. परंतु हा रस्ता वर्दळीचा असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविली गेली नसल्यामुळे तेथे वाहनांसह नागरिकांची कोंडी झाली. या कोंडीतून वाहने बाहेर काढताना अनेकांची दमछाक झाली. राजारामपुरीतील भाजी मंडईत तर नऊ नंबरच्या शाळेवर भरविण्यात आली होती.
-लाऊड स्पीकरवरुन सूचना -
शहरातील गर्दीच्या ठिकाणी नागरिकांना लाऊड स्पीकरवरुन सूचना देण्यात येत होत्या. दुकानदार नियम पाळत नसतील तर त्यांना नियम पाळण्याचे, सामाजिक अंतर ठेवण्याचे, मास्कचा वापर करण्याचे आवाहन महापालिका कर्मचारी व पोलीस करत होते. लाऊड स्पीकर लावलेली वाहन सतत गस्त घालत फिरत होती.
-कोल्हापूर शहर पुन्हा झाले बंद -
सकाळी अकरा वाजेपर्यंतची मुदत संपल्यानंतर कोल्हापूर शहर पुन्हा एकदा बंद झाले. सर्व दुकाने, भाजी मंडई बंद झाल्या. पोलिसांनी वेळ संपताच सर्व व्यवहार पुन्हा बंद केले.
ॲटोरिक्षा ही धावल्या -
सकाळपासून शहरातील ॲटोरिक्षा ही रस्त्यावर धावताना दिसल्या. नागरिक मोठ्या संख्येने खरेदीला बाहेर पडल्यामुळे ॲटोरिक्षा चालकांनीही सकाळच्या सत्रात रिक्षा वाहतूक केली .चालकांनीही सकाळच्या सत्रात रिक्षा वाहतूक केली.