कोल्हापूर : येथील विभागीय क्रीडा संकुलातील एक जलतरण व डायव्हिंग तलावात मिसळणारे सांडपाणी रोखण्यासाठी तलाव कोरडे करण्याच्या कामास सुरुवात झाली आहे. गेल्या चार दिवसांपासून पाणी उपसण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने तलावाच्या कामास खऱ्या अर्थाने मुहूर्त सापडल्याची भावना जलतरणपटूंकडून व्यक्त होत आहे.विभागीय क्रीडा संकुलाच्या बांधकामास सन २००९ पासून सुरुवात झाली. त्यात धावनमार्ग, फुटबॉल मैदान, बास्केटबॉल, टेनिस, कबड्डी, खो-खो आदी मैदाने तयार झाली. मात्र, जलतरण तलाव, डायव्हिंग तलाव कैद्यांच्या शेतातून जाणाऱ्या सांडपाण्यामुळे तयार होऊन सुरू झाले नाहीत. सर्व प्रयत्नांअंती त्यात सांडपाणी मिसळू लागल्याने ते दुरूस्त करावे की अन्यत्र बांधावे. याबाबत गेल्या तीन वर्षांत मोठा खल झाला.
अखेरीस विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी कडक कारवाईचे संकेत दिल्यानंतर सर्व यंत्रणा कामास लागल्या. त्यातून आयआयटीच्या तज्ज्ञांना ‘पाणी नेमके कुठे मुरते’ याचा शोध घेण्यासाठी पाचारण करण्याचे ठरविले. मात्र, पावसामुळे या कामास पुन्हा ‘खो’ लागला. मागील आठवड्यातही तलावातील पाणी काढण्याचे काम सुरू झाले.
पुन्हा पावसाने अचानक हजेरी लावली. त्यात पुन्हा तलावात पाणी भरले. पुन्हा शनिवार(दि. २०)पासून पाणी काढण्याचे काम सुरू झाले आहे. त्यात दोन मोटारपंप लावण्यात आले आहेत. पाणी उपसण्याची प्रक्रिया धिम्या गतीने होत असल्याने या दोन पंपांद्वारे तत्काळ पाणी उचलले जात नाही. त्यामुळे मोठ्या अश्वशक्तीच्या मोटारपंपाची गरज या दोन्ही तलावांच्या ठिकाणी आहे. तरच येत्या आठवडाभरात हजारो लिटरचे हे तलाव मोकळे होतील.
तलाव पूर्णपणे कोरडे करण्याच्या सूचना आयआयटीच्या तज्ज्ञांनी दिल्या आहेत. समिती नेमके कुठे पाणी मुरते याचा शोध घेणार आहे. एकूणच धिम्यागतीने का होईना जलतरण तलावाच्या कामास मुहूर्त लागल्याने पुन्हा एकदा जलतरणपटूंच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. यासह संकुलाच्या प्रवेशद्वाराच्या कामास सुरुवात झाली आहे.
तलाव पूर्ण कोरडे झाल्यानंतर तत्काळ आयआयटीच्या तज्ज्ञांना पाचारण केले जाईल. त्यानंतर अहवाल प्राप्त झाल्यानंतर दुरूस्ती अथवा अन्य पर्यायांचा विचार केला जाईल.- चंद्रशेखर साखरे, जिल्हा क्रीडाधिकारी, कोल्हापूर