कोल्हापूर : आगामी निवडणुकीत भाजप-शिवसेना युती झाली पाहिजे, ही जनतेची अपेक्षा असल्याने त्याचा आदर राखत शिवसेनेशी युती करण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत. शिवसेनेसह जे समविचारी घटक येतील त्यांना सोबत घेऊन युती केली जाईल; परंतु जर कोणी येणार नसेल, तर स्वबळावर निवडणूक जिंकण्याची आमची तयारी झाली आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.राज्यपातळीवर अद्याप शिवसेनेबरोबर चर्चेला बसलेलो नाही. युती व्हावी ही जनतेची आणि भाजपचीही अपेक्षा आहे. जनतेचा आदर म्हणून आम्ही तसे प्रयत्न करीत आहोत. भाजपसह इतर समविचारी पक्षांनी एकत्र यावे, मतांचे विभाजन टाळावे यासाठी युती झाली पाहिजे.
एनडीएमधील सर्वच पक्षांचा मान-सन्मान ठेवून काम करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. त्यातूनही कोणी आमच्या सोबत येणार नसेल तर मग आम्हाला स्वबळावर लढावे लागेल. आमची जिंकण्याची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. संघटनात्मक ताकदीवर समोर कोणीही विरोधक असला तरी त्याला आडवे करून निवडणुका जिंकल्या जातील, असा दावा दानवे यांनी केला.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे युती गेली खड्ड्यात असे म्हणत असल्याकडे लक्ष वेधले असता दानवे म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व प्रमोद महाजन यांनी युतीचा फॉर्म्युला ठरविला आहे. तो लोकसभेच्या गतनिवडणुकीपर्यंत तसेच आजही कायम आहे. यापुढेही युतीचा फॉर्म्युला कायम ठेवण्याबात दिल्लीवरून निर्णय घेतले जातीत. प्रश्न स्वबळाचा नाही, आघाडीच्या राजकारणाचा आहे. तरीदेखील लोकसभेच्या ४८ मतदारसंघांत आम्ही तयारी पूर्ण केलेली आहे.भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसनेला दिलेल्या इशाऱ्याबाबत विचारले असता त्यांच्या बोलण्याचा अर्थ युती लवकरच जाहीर झाली पाहिजे असा होतो, असे दानवे यांनी स्पष्ट केले.
४८ मतदारसंघांत बुथनिहाय बांधणीराज्यातील ४८ मतदारसंघांत लोकसभेची बांधणी झाली असल्याचे दानवे यांनी स्पष्ट केले. गेल्या एक महिन्यापासून उत्तर महाराष्ट्र , विदर्भ, मराठवाडा, मुंबई, दक्षिण महाराष्ट्र येथील ३६ मतदारसंघांत जाऊन आढावा घेत आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना एकत्रित करणे, संघटना मजबूत करणे आणि अमित शहा यांनी दिलेल्या २३ कामांची माहिती देण्याकरिता मी राज्यभर फिरत आहे.
विधानसभेच्या २४८ मतदारसंघांत विस्तारक, तसेच ४८ मतदारसंघांत पूर्णवेळ विस्तारकांच्या नियुक्त्या झाल्या आहेत. प्रत्येक बुधवर पंचवीस कार्यकर्ते नियुक्त केले आहेत. त्यांना कामाची माहिती देण्यात आली आहे. संघटनात्मक ताकदीवर निवडणूक जिंकण्याची तयारी पूर्ण झाली आहे, असेही दानवे यांनी सांगितले.
कॉँग्रेसवर हल्लाबोलदेशात अनेक पक्षांच्या आघाड्या होत आहेत. कालच उत्तर प्रदेशात अखिलेश यादव आणि मायावती यांच्यात आघाडी झाली. कॉँग्रेस पक्ष या सगळ्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करीत आहे; परंतु पंतप्रधानपदाचा चेहरा त्यांनी सांगितलेला नाही. अशा कितीही आघाड्या झाल्या तरी नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील, याचा मला ठाम विश्वास असल्याचे दानवे यांनी सांगितले.
४ मार्चच्या दरम्यान अधिसूचनागत लोकसभा निवडणुकीची अधिसूचना ४ मार्चला झाली होती. त्यामुळे यंदाही त्या दरम्यानच लोकसभा निवडणुकीची अधिसूचना जाहीर होईल, अशी शक्यताही रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केली.