कोल्हापूर : शुभेच्छांचा वर्षाव करत, संगीताच्या तालावर थिरकत, फटाक्यांची आतषबाजी, विद्युत रोषणाईसह काही संस्थांनी सामाजिक उपक्रम राबवून कोल्हापूरकरांनी नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागत केले. येणारे वर्ष एक नवी उमेद घेऊन येईल, अशी आशा बाळगत अनेकांनी नव्या वर्षाचे निरनिराळे संकल्प केले आणि ते पूर्ण करण्याचा निश्चयही केला. अनेक हॉटेलमध्ये रात्री उशिरापर्यंत लोकांना प्रतीक्षा करावी लागत होती. कोल्हापुरातील रस्ते पहाटेपर्यंत फुलले होते. नववर्षाच्या स्वागताला अंबाबाईसह जोतिबा व इतर धार्मिक स्थळांवर भाविकांचीही प्रचंड गर्दी होती.
शहरात रविवारी संध्याकाळपासूनच ‘न्यू इयर’च्या सेलिब्रेशनला सुरुवात झाली होती. नागरिकांनी रात्री बाराच्या ठोक्याला मित्रमंडळींना नव्या वर्षाच्या शुभेच्छा देऊन सरत्या वर्षाला निरोप दिला. घराघरांतही नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी छोटेखानी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कुटुंबासह वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचा बेत आखून घरच्या घरीच अनेकांनी सेलिब्रेशन करणे पसंत केले. रात्री उशिरापर्यंत शहरातील सर्व रस्ते गजबजले होते. शहरातील अनेक हॉटेल्स, रेस्टॉरंट, बार, पबमध्ये नव्या वर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी होती. तरुणाईचे लक्ष वेधून घेण्यासाठी डीजे आणि लाईव्ह म्युझिकचे आयोजनही होते. संध्याकाळनंतर या सर्व ठिकाणी तरुण-तरुणींनी गर्दी करून नववर्षाची पूर्वसंध्याही जल्लोषात साजरी केली. या सगळ्या जल्लोषाच्या वातावरणात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. मात्र, पोलिसांनी तरुणाईच्या आनंद व उत्साहावर विरजण पडू दिले नाही.