कोल्हापूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १४९ व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात ‘गांधींचं करायचं काय?’ हा मुक्त नाट्याविष्कार सजला. इचलकरंजी येथील राष्ट्रसेवा दलातर्फे स्मिता पाटील कलापथक प्रस्तूत हा नाट्याविष्कार अनुभवण्यासाठी हाऊसफुल्ल गर्दी झाली.
स्वातंत्र्यानंतर महात्मा गांधी यांच्याविषयी अनेक गैरसमज पसरवले गेले. त्यावर या नाट्याविष्काराने परखड भाष्य केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी महात्मा गांधी यांची विचारसरणी, काँग्रेस मंत्रिमंडळातही डॉ. आंबेडकर यांना स्थान देण्यासाठी महात्मा गांधी यांनी घेतलेली महत्त्वपूर्ण भूमिका अशा विविध बाबींवर प्रकाशझोत टाकण्यात आला.
या मुक्तनाट्याचे दिग्दर्शन प्रतीक जाधव यांनी केले तर संजय रेंदाळकर यांचे लेखन केले. विनायक होगाडे, अमोल पाटील, सौरभ पोवार, नम्रता कांबळे, प्रफुल्ल आवळे, शरद वास्कर, दामोदर कोळी, मानसी सावंत, अमोल वरुटे, अरुण भोसले यांच्या भूमिका होत्या. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने संयोजन केले. महात्मा गांधी यांच्या १४९ व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला सोमवारी संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात ‘गांधींचं करायचं काय?’ हे मुक्तनाट्य इचलकरंजी येथील राष्टसेवा दलातर्फे सादर करण्यात आले.