कोल्हापूर : गहू, रवा, मैदा, अट्टाच्या दरात किलोमागे चार रुपयांनी वाढ झाली असून आता तेलाची फोडणीने गृहिणींना चांगलाच चटका दिला आहे. भाजीपाल्याची आवक थोडीशी वाढली असून दरात घसरण सुरू झाली आहे. कोथिंबिरीची आवकही वाढली असून घाऊक बाजारात सरासरी तीन रुपये पेंढी झाली आहे. कडधान्यांच्या दरात फारशी चढउतार दिसत नाही.आठवडाभरावर श्रावण आल्याने बाजारात हळूहळू ग्राहकांची रेलचेल वाढली आहे. उपवासासाठी लागणाऱ्या पदार्थांची खरेदी विक्रीसाठी व्यापाऱ्यांची धांदल उडाली, त्या पार्श्वभूमीवर शाबू, शेंगदाणे, गोडे तेलाच्या दरात थोडी वाढ झाली आहे.
सरकी तेलाच्या दरातही आणखी वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. एक नंबर शाबू ६० रुपये किलो असून सरासरी किलोमागे पाच रुपयांची वाढ झाली आहे.
शेंगदाणाच्या दरातही वाढ झाली आहे, प्रतिकिलो ८० व १०० रुपये दर राहिला आहे. रवा, अट्टा, मैदा व गहूच्या दरात प्रतिकिलो चार रुपयांची वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात सरासरी ३२ रुपये किलो दर राहिला आहे.पावसाने थोडी उसंत घेतल्याने भाजीपाल्याची आवक बऱ्यापैकी सुरू आहे. कोबी, वांगी, ढब्बू, घेवडा, गवार, भेंडीच्या दरात थोडी घसरण झालेली दिसते. कारल्याची आवक थोडी मंदावल्याने गत आठवड्याच्या तुलनेत दरात वाढ झाली आहे.
दोन-तीन आठवडे काहीसा वधारलेला टोमॅटो मात्र या आठवड्यात खाली आला आहे. घाऊक बाजारात सरासरी साडेसहा रुपये किलोपर्यंत दरात घसरण झाली आहे. ओल्या वाटाण्याची आवक वाढली असून बाजार समितीत रोज दोनशेहून अधिक पोत्यांची आवक सुरू आहे. घाऊक बाजारात तीस रुपये किलो दर आहे.फळ मार्केटमध्ये फारशी चढउतार दिसत नाही. अननस, डाळिंब, पपई, तोतापुरी आंब्याची आवक चांगली आहे. सिताफळाची आवक सुरू झाली असून सफरचंद आपला दर टिकवून आहे.
वाहतूकदारांच्या संपाचा परिणाममाल वाहतूकदारांचा संप जरी मिटला असला, तरी बाजारपेठेवरील ताण अद्याप कमी झालेला दिसत नाही. मालाची उचल करण्यासाठी गाड्या मिळत नसल्याने अपेक्षित मालाची आवक होत नाही, त्याचा परिणाम दरावर झाल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे.
कांदा, बटाट्याच्या दरात वाढकांद्याची आवक थोडी मंदावली आहे; त्यामुळे दरात सुधारणा झाली आहे. घाऊक बाजारात सरासरी ११ रुपये किलो झाला असून बटाट्याचा दर वीस रुपयेपर्यंत गेला आहे.