कोल्हापूर : विसर्जन मिरवणुकीसाठी ‘व्हाईट आर्मी’चे पथक सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 04:59 PM2018-09-21T16:59:36+5:302018-09-21T17:04:18+5:30

कोल्हापूर शहरात उद्या, रविवारी होणाऱ्या सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत जीवनमुक्ती सेवा संस्थेचे (व्हाईट आर्मी) जवान आणि डॉक्टरांचे १५० जणांचे पथक कार्यरत असणार आहे. या विसर्जन मिरवणुकीत सेवा पुरविण्यासाठी सामाजिक संस्थांची तयारी पूर्ण झाली आहे.

Kolhapur: 'White Army' team ready for immersion procession | कोल्हापूर : विसर्जन मिरवणुकीसाठी ‘व्हाईट आर्मी’चे पथक सज्ज

कोल्हापूर : विसर्जन मिरवणुकीसाठी ‘व्हाईट आर्मी’चे पथक सज्ज

ठळक मुद्देविसर्जन मिरवणुकीसाठी ‘व्हाईट आर्मी’चे पथक सज्जतयारी पूर्ण; चार ठिकाणी वैद्यकीय सुविधा

कोल्हापूर : शहरात उद्या, रविवारी होणाऱ्या सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत जीवनमुक्ती सेवा संस्थेचे (व्हाईट आर्मी) जवान आणि डॉक्टरांचे १५० जणांचे पथक कार्यरत असणार आहे. या विसर्जन मिरवणुकीत सेवा पुरविण्यासाठी सामाजिक संस्थांची तयारी पूर्ण झाली आहे.

व्हाईट आर्मी’च्या माध्यमातून विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, अंबाबाई मंदिर (महाद्वार रोड), पापाची तिकटी येथे वैद्यकीय पथकांसह रेस्क्यू टीम असणार आहे. पॉकेट लाईनच्या आधारे मिरवणुकीतील गर्दीवर नियंत्रण ठेवले जाईल.

मिरवणूक मार्गावरील व्यवस्था लावण्यासह आपत्ती घडल्यास नियोजनबद्ध आणि प्रथमोपचार करून डॉक्टरांच्या सल्ल्याने पीडितांना सीपीआर रुग्णालयात पुढील उपचारासाठी नेण्यात येणार आहे.

वैद्यकीय पथकांमध्ये जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, डॉक्टरांची निहा संघटना, कोल्हापूर जिल्हा मुस्लिम मेडिको आणि पॅरामेडिको असोसिएशन या संघटनांचे पदाधिकारी, सभासद डॉक्टरांचा सहभाग असणार आहे.

आपत्कालीन वैद्यकीय पथकाजवळ सावली केअर सेंटर, अ‍ॅस्टर आधार हॉस्पिटल यांच्या रुग्णवाहिका असणार आहेत. आपत्तीकालीन आणि वैद्यकीय पथकांचे मदतकार्य रविवारी सकाळी दहा ते सोमवारी (दि. २४) सकाळी सहा वाजेपर्यंत उपलब्ध असणार आहे.

नदीघाटावर आपत्कालीन कक्ष

पंचगंगा नदीघाटावर विसर्जनावेळी दुर्घटना टाळण्यासाठी व्हाईट आर्मीची यांत्रिक बोट, वॉटर रेस्क्यू टीम तैनात आहे. त्यासाठी आपत्कालीन कक्षही स्थापन केला असल्याचे ‘व्हाईट आर्मी’चे संस्थापक अशोक रोकडे यांनी सांंगितले.

ते म्हणाले, गेल्या बारा वर्षांचा कोल्हापुरातील सावर्जनिक गणेश विसर्जनाअंतर्गत केलेल्या कामाचा आढावा घेऊन, प्रतिवर्षी नियोजनात बदल घडवून कोणतीही वित्त किंवा जीवितहानी टाळण्यासाठी सुरक्षिततेचा कार्यक्रम आखला आहे. यावर्षी कोणतीही दुर्घटना घडल्यास प्रथमोपचार, तात्पुरती वैद्यकीय सेवा देऊन पुढील कार्यवाहीसाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्याची काळजी घेण्यात येईल. मिरवणूक संपेपर्यंत ‘व्हाईट आर्मी’चे जवान कार्यरत असतील.

महाविद्यालयातील दोनशे विद्यार्थी करणार मदत

या मिरवणुकीत निसर्गमित्र, विज्ञान प्रबोधिनीचे पदाधिकारी, कार्यकर्ते पर्यावरणपूरक गणेश विसर्जन, निर्माल्यदानासाठी आवाहन करणार आहेत. कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे याबाबत आवाहन केले जाणार आहे. किर्लोस्कर वसुंधरा फिल्म फेस्टिव्हलअंतर्गत ‘इकोरेंजर्स’ म्हणून शहरातील विविध दहा महाविद्यालयांतील एकूण २०० विद्यार्थी-विद्यार्थिनी या पंचगंगा नदीघाट, इराणी खण, राजाराम बंधारा येथे गणेश विसर्जनासाठी प्रशासनाला मदत करणार असल्याचे पर्यावरणतज्ज्ञ उदय गायकवाड यांनी सांगितले.
 

 

Web Title: Kolhapur: 'White Army' team ready for immersion procession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.