कोल्हापूर : राज्य परिवहन महामंडळाकडे बस आणि बसस्थानकांच्या सफाईसाठी स्वच्छ कर्मचारी आणि सफाई कामगार कार्यरत असताना खासगी कंत्राटदारास ४४७ कोटी रुपयांचे कंत्राट दिले आहे. खासगी शिवशाही बसमध्ये प्रचंड भ्रष्टाचार होत असतानाच खासगी वाहकांची नियुक्ती केली जात आहे. यामुळे भविष्यात परिवहन मंत्र्यांना एसटी महामंडळ बंद करून, संपूर्ण महामंडळाचे खासगीकरण करण्याचा डाव आखल्याची टीका महाराष्ट्र एस. टी. वर्कर्स काँग्रेस इंटकचे अध्यक्ष आणि माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.कोल्हापूर, सांगली, सातारा विभागातील इंटकच्या प्रमुख पदाधिकारी यांच्या बैठकीसाठी कोल्हापुरात आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. छाजेड म्हणाले, एस. टी. महामंडळाने मोठा गाजावाजा करून सुरू केलेल्या भाडेतत्त्वावरील ‘शिवशाही’ या बस सेवेवर उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक होत आहे.
या खासगी गाडीवर प्रशिक्षित चालक नाहीत, व्यसनी चालकांमुळे गेल्या तीन-चार महिन्यांत २३० गंभीर स्वरूपाचे अपघात झाले, तेवढे अपघात गेल्या १0 वर्षांत महामंडळाच्या लाल गाडीनेही केले नसतील. शिवशाहीच्या माध्यमातून एस. टी.चे सूक्ष्म खासगीकरण केले असल्याने आम्ही सुरुवातीपासून त्यास विरोध करत होतोच.
एस. टी. कर्मचाऱ्यांची देणेबाकी असताना महामंडळाने शिवशाहीच्या गोंडस नावाखाली खासगी वाहतूक कंपन्यांचे हित साधले आहे. यातून महामंडळास लाभ तर काहीच होत नाही, तर महामंडळाच्या तिजोरीतील पैशांतून खासगी बसकंपन्या मालामाल होत आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे.महाराष्ट्रातील सामान्य जनतेला सुरक्षित प्रवासाची संधी मिळावी म्हणून देशामध्ये कायदा करून परिवहन मंडळ निघाले आहे. या सरकारने आणलेले परिवहन मंडळ नाही. त्यांनी कितीही संपविण्याचा प्रयत्न केला, तरी प्राण पणास लावून, कामगार संघटना एकत्र येऊन या विरोधात लढू आणि एस. टी. वाचविल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असे त्यांनी सांगितले.
यावेळी इंटकचे सरचिटणीस मुकेश टिगोटे, महिला अध्यक्षा सारिका शिंदे, विभागीय सचिव आप्पासाहेब साळोखे, अध्यक्ष आनंदराव दोपारे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.