कोल्हापूर : झीप क्वॉईन क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास मोठ्या रकमेचा फायदा करून देतो, असे आमिष दाखवून महाराष्ट्रसह कर्नाटकातील गुंतवणूकदारांना करोडोंचा गंडा घातल्याप्रकरणी भामटा राजेंद्र नेर्लेकर याची पत्नी पद्मा (३५), मुलगा बालाजी (१९, दोघे, रा. हुपरी) यांना मंगळवारी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांचेसह मुख्य सूत्रधार बालाजी गणगे (रा. पुणे) याला न्यायालयात हजर केले असता कळंबा कारागृहात रवानगी करण्यात आली.भामटे बालाजी गणगे, राजेंद्र नेर्लेकर आणि संजय कुंभार या तिघांनी नोव्हेंबर २०१७ ला भागीदारीमध्ये ‘झीप क्वॉईन क्रिप्टो करन्सी’ ही डिजीटल कंपनी काढली. तिचे कार्यालय लक्ष्मीपुरी कोंडा ओळ येथे सुरू केले.
या कंपनीची आॅनलाईन जाहिरात मोठ्या प्रमाणात करून गुंतवणूकदारांना महिन्याला पंधरा टक्के लाभांश बीट क्वॉईनच्या रूपात देतो, असे आमिष दाखवून दहा हजारांपासून लाखो रुपयांपर्यंत महाराष्ट्रसह कर्नाटकातील गुंतवणूकदारांकडून पैसे घेतले.
कंपनी बंद केल्यानंतर आपली फसवणूक झालेचे लक्षात आल्याने गुंतवणूकदारांनी पोलीसांत फिर्याद दिली. या गुन्ह्यात आतापर्यंत या तिघांसह अनिल नेर्लेकर, पद्मा नेर्लेकर, बालाजी नेर्लेकर अशा एकुन सहा जणांना अटक केली.
आतापर्यंत सतरा तक्रारी दाखल झाल्या आहेत. बाळासाहेब लक्ष्मण झालटे (४२, रा. शिवाजी पार्क) यांनी मंगळवारी शाहुपूरी पोलीसांत फिर्याद दिली.