कोल्हापूर : दोन कोटी रुपये उकळण्याच्या उद्देशाने स्वत:च्या मुलास डांबून ठेवल्याप्रकरणी पत्नी, सासू, सासऱ्यासह पाच जणांवर राजारामपुरी पोलिसांत बुधवारी (दि. २५) रात्री गुन्हा दाखल झाला.याबाबतची फिर्याद राजारामपुरी दुसरी गल्ली येथील गिरीश प्रकाश भंडारे (वय ३५, रा. घर नंबर १७७८ बी / २, ई वॉर्ड) यांनी न्यायालयात दिली. या प्रकरणी संशयित पत्नी सुप्रिया गिरीश भंडारे (वय ३३), सासरा मोहन बाळकृष्ण मांगलेकर (७०), सासू सुनीता मोहन मांगलेकर (६८), मेहुणा स्वप्निल मोहन मांगलेकर (३३) व मेहुण्याची पत्नी वीणा स्वप्निल मांगलेकर (२४, सर्व रा. चंद्रभागा बंगला, प्लॉट नंबर २४, जयभवानी कॉलनी, फुलेवाडी, कोल्हापूर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.पोलिसांनी सांगितले की, गिरीश भंडारे यांचा ४ फेब्रुवारी २००७ रोजी सुप्रिया यांच्याबरोबर प्रेमविवाह झाला. त्यानंतर या दोघांत वाद झाला. या वादाचा दावा न्यायालयात सुरू आहे. त्यांना शौर्य हा मुलगा आहे. पत्नी सुप्रिया भंडारे हिने संगनमत करून पती गिरीश भंडारे यांच्याकडून दोन कोटी रुपये उकळण्याच्या उद्देशाने मुलगा शौर्य याला अज्ञातस्थळी डांबून ठेवले.
दरम्यानच्या कालावधीत गिरीश यांना मुलास भेटू दिले नाही. अखेर, गिरीश भंडारे यांनी २४ जुलै २०१८ ला न्यायालयात याबाबतची फिर्याद दिली. त्यानुसार या पाचजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. याचा तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.