गारगोटी : वन्यजिवांची शिकार केल्याप्रकरणी मानवळे (ता. भुदरगड) येथील संशयित सतीश विलास खोपकर याला वनविभागाने मुद्देमालासह पकडून गुन्हा दाखल केला. या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे.अधिक माहिती अशी, संशयित आरोपी सतीश विलास खोपकर याने रानडुकराची शिकार केल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. त्यांनी बुधवारी (दि. ३०) रात्री सुमारे दहाच्या सुमारास गारगोटीतील वनक्षेत्रपाल कूरचे वनपाल, पिंपळगावचे वनपाल आणि वनक्षेत्रातील वनरक्षक, वनसेवक यांच्यासमवेत सतीश खोपकर यांच्या घराची झडती घेतली असता वन्यप्राणी रानडुकराचे शिजवलेले मांस मिळून आले. सतीश खोपकर यांची कसून चौकशी केली असता त्यांच्या स्वत:च्या मालकीच्या शेतामध्ये विद्युततारेचा प्रवाह सोडून वन्यप्राणी रानडुक्कराची शिकार केली असल्याचे प्राथमिक चौकशीमध्ये सांगितले. संशयित आरोपीला अटक करून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी गारगोटी यांच्या न्यायालयात हजर केले. त्यांनी या प्रकरणी कोठडी सुनावली आहे.ही कारवाई उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद, सहायक वनरक्षक एन. एस. कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश तायनाक, वनपाल सदाशिव देसाई, मधुकर काशीद, वनरक्षक मारुती कांबळे, सरिता बावस्कर, वनिता कोळी, भिकाजी तांबेकर, आशिष चाळसकर, संजय चौगुले, सदाशिव सांगले आणि वनसेवक यांनी केली.
Kolhapur: रानटी डुकराची शिकारी, मानवळेतील एकास अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2024 3:35 PM