कोल्हापूर : कोल्हापूर चित्रनगरी आता लोकेशन्सने सुसज्ज आहे. पुढील काळात अत्याधुनिक स्टुडिओ, नावीन्यपूर्ण सेट येथे उभारणार आहेत. दुसरीकडे जिल्ह्यातील नैसर्गिक लोकेशन्सवर मालिका व चित्रपटांचे चित्रीकरण सुरू आहे. येथील निसर्ग, कलाकार, तंत्रज्ञ, या क्षेत्राचा अनुभव असलेल्या व्यक्ती या सगळ्या पार्श्वभूमीवर चित्रनगरीत मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध झाल्या आणि येथे चित्रीकरणासाठी निर्मात्यांना प्रोत्साहित करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला, तर कोल्हापूर पुन्हा चित्रपटनिर्मितीचे केंद्र बनेल, असा विश्वास सिनेसृष्टीतील मान्यवरांनी व्यक्त केला.शाहू स्मारक भवनात मराठी चित्रपट व्यावसायिक समितीच्या वतीने आयोजित कोल्हापूर चित्रपट निर्मिती शताब्दीपूर्ती कृतज्ञता सोहळ्याचा समारोप कोल्हापूरच्या चित्रपटसृष्टीला गतवैभव कसे मिळवून देता येईल, या विषयावरील चर्चासत्राने झाला. यात चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक संजय पाटील, अभिनेते राहुल सोलापूरकर, आनंद काळे, विजय पाटकर, अभिनेत्री अलका कुबल यांनी सहभाग घेतला.संजय पाटील म्हणाले, कोल्हापूर चित्रनगरीत सध्या दोन मालिकांचे चित्रीकरण सुरू आहे. भविष्यात येथे मोठा स्टुडिओ, रेल्वे स्टेशन, वाडा, चाळ, सुसज्ज मेकअप रूम, निवासासाठी ५० खोल्या अशा अत्याधुनिक सुविधा देण्यात येणार आहेत. शासन म्हणून चित्रनगरी चालण्यासाठी आम्ही ध्येयाने काम करीत आहोत. आता मुंबई-पुण्याच्या निर्मात्यांना येथे चित्रीकरणासाठी प्रोत्साहित करणे, त्यांना इथपर्यंत घेऊन येणे गरजेचे आहे.आनंद काळे म्हणाले, कोल्हापुरात सध्या सात मालिका, दोन चित्रपटांचे चित्रीकरण सुरू आहे. हॉलिवूडपट येथे तयार झाला. निर्माते व चॅनेलना चित्रीकरणाच्या दरम्यान येऊ शकणाऱ्या अडचणी दूर केल्या की ते आनंदाने कोल्हापुरात चित्रीकरण करायला तयार होतात. चित्रनगरीचे सेट गोरेगावपेक्षा अप्रतिम झाले आहेत; पण चित्रीकरणासाठीच्या मूलभूत सुविधा नाहीत, त्या दूर केल्या तर एकही दिवस चित्रनगरी रिकामी राहणार नाही.विजय पाटकर म्हणाले, सर्वांच्या सोयीच्या दृष्टीने चित्रीकरणासाठी मुंबईला प्राधान्य दिले जाते हे खरं असलं तरी मध्यंतरीच्या काळात कोल्हापूरचे लोक या क्षेत्रापासून, या मातीपासून दुरावले. येथील चित्रपट निर्मिती थांबली, सोयीसुविधा मिळाल्या नाहीत. म्हणून कोल्हापूर मागे पडले. ते गतवैभव परत मिळवायचे असेल तर कोल्हापूरच्याच लोकांनी पुढाकार घ्यावा.राहुल सोलापूरकर यांनी या चर्चासत्राचे बहारदर निवेदन करीत कोल्हापूरला आपण पुन्हा चित्रपटसृष्टीचे माहेरघर कसे करू शकतो यावर मान्यवरांच्या संकल्पना जाणून घेतल्या. दिग्दर्शक चंद्रकांत जोशी यांनी प्रास्ताविकात या शहराला लाभलेल्या चित्रपट परंपरेची आठवण करून देत या क्षेत्राच्या पुनरुज्जीवनाचे महत्त्व विशद केले. शुभदा हिरेमठ यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी माई पाटील, सतीश बिडकर, सुभाष भुरके अशा सिनेव्यावसायिकांचा सत्कार करण्यात आला.डाटा ट्रान्स्फरची चिंता नकोयावेळी अलका कुबल यांनी मुंबई-कोल्हापूर हे अंतर जास्त असल्याने चित्रीकरणाचे साहित्य पोहोचविणे, नैसर्गिक आपत्ती आली की चित्रीकरण थांबणे, कलाकारांची गैरसोय, चित्रीकरण झालेले शूट पाठविणे अशा तांत्रिक अडचणी येतात असे सांगितले. यावर संजय पाटील म्हणाले, चित्रनगरीमध्ये हा डाटा ट्रान्स्फर करण्यासाठी विशेष इंटरनेट सुविधा देण्यात आली आहे. अवघ्या चार तासांच्या आत सगळे शूट मुंबईला पोहोचेल; त्यामुळे त्याची चिंता नको.