कोल्हापूर : छत्रपती शाहू मिल हे महाराजांचे जिवंत स्मारक ठरेल अशा पद्धतीने व्यापार, उद्योग, रोजगार, स्कील डेव्हलपमेंटच्या दृष्टीने विकास आराखडा करा, सर्व राजघराणे, लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्या आणि आराखडा वेगाने पूर्ण करण्यासाठी तयारीला लागा. पुढील सहा महिन्यात शाहू मिलसह कोल्हापूरचा कायापालट झाला पाहिजे, अशी सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सोमवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केल्या. अंबाबाई भक्तांसाठी स्वच्छतागृह उभारणीसाठी दीड कोटी आणि पंचगंगा घाट संवर्धनासाठी ४ कोटी रुपयांचा निधी तातडीने वर्ग केला.जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, इचलकरंजी महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार यांच्यासह नियोजन समिती सदस्य उपस्थित होते.पालकमंत्री केसरकर म्हणाले, शाहू मिलच्या ४५ कोटींच्या प्रकल्पाचे टप्पे करा. पहिल्या १६८ कोटींच्या टप्प्यामध्ये मोठे कन्व्हेन्शन सेंटर, स्कील डेव्हलपमेंट विभाग, इचलकरंजीतील कापड विक्री केंद्र, कोल्हापुरी चप्पल, गूळ, साज, चांदीचे दागिने असे कोल्हापूरची खासियत असलेले विभाग सुरू करा. शाहू महाराजांनी उभारलेले राधानगरी धरण, हॉस्टेल, व्यापार पेठ यांच्या प्रतिकृती निर्माण करा, तलावात महाराजांचा भव्य पुतळा उभारा. त्याशेजारीच संस्थानचा इतिहास, होऊन गेलेले राजे-त्यांची कारकीर्द याची माहिती मिळाली पाहिजे.अंबाबाईच्या परस्थ भाविकांसाठी सुसज्ज स्वच्छतागृह उभारा, त्यासाठी दीड कोटींचा निधी तातडीने वर्ग केला जाईल. पंचगंगा घाट संवर्धनासाठी ४ कोटींचा निधी तातडीने वर्ग करा शिवाजी पुलावर विद्युत रोषणाई करा, तेथे छोटे तंबू उभारणी, बसण्यासाठी सोय, कोल्हापुरी खाद्यपदार्थ मिळतील, महिलांना रोजगार मिळेल असे नियोजन करा, पण खासगीकरण होणार नाही याची काळजी घ्या, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.रस्त्यांसाठी १० कोटीकोल्हापुरातील रस्त्यांच्या दुरावस्थेवर बोट ठेवत पालकमंत्र्यांनी रस्ते दुरुस्ती वेगाने पूर्ण करा, अशी सूचना करत नगरोत्थानमधून १० कोटी रुपये देण्याचे जाहीर केले. इचलकरंजी महापालिकेसाठी ५ कोटी आणि उरलेल्या १५ कोटीत सर्व नगरपालिका, नगरपरिषदांना निधी द्या. पण एकाच एजन्सीला काम देऊ नका. वेगवेगळ्या कॉन्ट्रॅक्टरची नियुक्ती करा. पुढील आठ दिवसात काम मार्गी लावा, असे त्यांनी सांगितले.महोत्सवासाठी तरतूदपालकमंत्री म्हणाले, नवरात्रोत्सवाला जोडून दसरा महोत्सव घ्या त्यासाठी पर्यटनमधून निधी द्या. कोल्हापुरात किमान २० दिवस हा उत्सव चालला पाहिजे. यासह पन्हाळा, आंबा, राधानगरी, खिद्रापूर, पारगड, इचलकरंजी येथे महोत्सवांचे नियोजन करा त्यासाठी जिल्हा नियोजनमधून निधीची तरतूद केली जाईल. हेरीटेज स्ट्रीट आराखड्याच्या १५ कोटींचे एस्टिमेट पाठवण्याची सूचना त्यांनी केली.
सहा महिन्यात कोल्हापूरचा कायापालट करणार, पालकमंत्री दीपक केसरकरांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 1:18 PM