कोल्हापूर : शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेचे काम रेंगाळले असून आपल्या कारकिर्दीत या कामास गती देण्यावर अधिक भर राहील, असे नूतन महापौर स्वाती यवलुजे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.महापौरपदी निवड झाल्यानंतर यवलुजे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. रखडलेल्या पाण्याच्या योजनेला गती देणे हे आपले सर्वाच्च प्राधान्य राहील. त्याअनुषंगाने येत्या आठ दिवसांतच पदाधिकारी, अधिकाऱ्यांसह योजनेच्या कामाची पाहणी केली जाईल. योजनेच्या आड आलेल्या तांत्रिक अडचणी सोडविल्या जातील, असे त्यांनी सांगितले.कसबा बावड्याजवळील झूम प्रकल्पावरील कचऱ्यांचे ढीग वाढले असून त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरीकांना कसा त्रास होतो हे मी स्वत: अनुभवत आहे. त्यामुळे तेथील सर्व कचरा उठावाचे तातडीने नियोजन केले जाईल. कचऱ्यावर वीजनिर्मिती करण्याचा प्रकल्प लवकरात लवकर कसा सुरू होईल याचाही विचार करण्यात येईल. महापालिका अधिकारी व रोकेम यांचे अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन सूचना दिल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.
कसबा बावडा येथील एसटीपी सध्या काही कारणांनी बंद आहे. तो लवकरात लवकर कसा सुरू होईल हे सुद्धा पाहिले जाईल. ड्रेनेजलाईन जोडण्याचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या जातील, असे यवलुजे म्हणाल्या.
‘आमदार पाटील यांच्याशी एकनिष्ठ, कट्टर समर्थक’ हीच त्यांची जमेची बाजू आहे. महापौरांचे माहेर बत्तीस शिराळा असून वडील एस. टी. कंडक्टर आहेत. सासरे सहायक फौजदार होते. कुकिंग आणि वाचन हा स्वातींचा आवडीचा छंद आहे.
केबल आॅपरेटर ‘सोन्या’ झाला उपमहापौर
नूतन उपमहापौर सुनील पाटील हे सर्वसामान्य कुटुंबातील असून मूळचे शिवसैनिक. एकेकाळी केबल आॅपरेटर म्हणून प्रभागात त्यांचा संपर्क होता. सामाजिक कार्याची आवड असल्याने महापालिकेची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेने त्यांना उमेदवारी नाकारली म्हणून राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली.
सन २०१०च्या निवडणुकीत ते प्रथम महापालिकेवर निवडून गेले. त्यानंतर २०१५ च्या निवडणुकीत पुन्हा राष्ट्रवादीच्या तिकिटावर दुसऱ्यांदा विजय मिळविला. गेली दोन वर्षे ते पक्षाचे गटनेते म्हणून काम पाहत होते. उपमहापौर होण्याची त्यांची इच्छा शुक्रवारी पूर्ण झाली.