आॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि. 0७ : कोल्हापूरच्या पर्यटनवृद्धीसाठी येत्या काही वर्षांत विविध योजना आणि उपक्रम राबविणार असल्याची माहिती कोल्हापूर रस्ते सौंदर्यीकरण प्रकल्पाचे (केएसबीपी) प्रमुख सुजय पित्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पित्रे म्हणाले, १६ जून २०१६ रोजी ‘केएसबी’ची स्थापना झाली. त्याआधी आम्ही आयआरबीने कंत्राट सोडल्यानंतर शहरातील दुभाजक आणि आयलंडची काय अवस्था झाली याचे सर्वेक्षण केले होते म्हणूनच पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिनाचे औचित्य साधून आम्ही दुभाजक आयलंड सुधारण्याची मोहीम हाती घेतली. त्यानुसार ११ चौक आणि २ मोठी उद्याने आम्ही विकसित केली.
महाराष्ट्र शासनाचे पर्यटन धोरण जाहीर झाले असून २०२५ साली त्यासाठी ३० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. पर्यटनासाठी आवश्यक असणारा समुद्रकिनारा सोडून सर्व काही एका कोल्हापूर जिल्ह्यात आहे म्हणूनचा पर्यटनासाठी पूरक वातावरण आणि मूलभूत आवश्यक बाबी कोल्हापुरात उभारल्या जाव्यात यासाठी आम्ही पुढाकार घेतला आहे. आमच्या अनेक प्रकल्पांपैकी ‘केएसबीपी’ हा एक प्रकल्प आहे.
आता कोल्हापूर पर्यटन विकास केंद्राच्या माध्यमातून पर्यटनविषयक वाढीसाठीचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील कुणीही तज्ज्ञ, नागरिक सहभागी होऊन आपली मांडणी करतील. त्यांना सहकार्य केंद्राच्यावतीने केले जाईल. कचरा निर्मूलन आणि त्यावरील प्रक्रिया याबाबतीतही काम केले जाणार आहे. कोणत्याही व्यक्ती अथवा पक्षासाठी हे काम सुरू नसून कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी हे प्रकल्प सुरू आहेत.
कोल्हापूरचा तिरंगा नेहमी फडकत राहील
काही दिवसांपूर्वी मोठ्या वादळामुळे ३०३ फूट उंचीचा ध्वज काही वेळासाठी आम्हाला उतरावा लागला. देशातील सर्वांत उंच असलेला वाघा सीमेवरील तिरंगा प्रचंड वाऱ्यामुळे नेहमी उतरून ठेवला जातो. रांची येथील ध्वजही उतरलेला आहे. पुण्यातील ध्वजही गेले चार दिवस उतरलेला आहे. मात्र, आम्ही वाऱ्याच्या वेगाचा अभ्यास करून कोल्हापूरचा झेंडा नेहमी फडकत राहील याची दक्षता घेतली आहे तसेच १०० फुटांपेक्षा उंच असणाऱ्या ध्वजाला खाली गेले किंवा पुन्हा फडकवणे यासाठी आचारसंहिता नसल्याचे यावेळी सांगण्यात आले.
उद्यानात शाहू महाराज, महाराणी ताराराणींची प्रतिमा
पोलिस उद्यानामध्ये छत्रपती शाहू महाराज, महाराणी ताराराणी आणि आद्य क्रांतिकारक चिमाजी अप्पा यांच्या प्रतिमा लावण्यात आल्या आहेत. छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृतिदिनी या प्रतिमा लावून अभिवादन करण्यात आल्याचे पित्रे यांनी सांगितले.