कोल्हापूर : शहरातील पाणीपुरवठ्यावर चर्चा करण्याकरिता महापालिकेची विशेष सभा बोलाविली आहे. त्यानंतरही जर शहरात सुरळीत पाणीपुरवठा झाला नाही तर मात्र अधिकाºयांना कार्यालयात बसू देणार नाही, असा इशारा शनिवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत देण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती आशिष ढवळे होते.
पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर झाल्यामुळे नागरिक आम्हाला घरी बसू देत नाहीत. पाण्याच्या वाटपामध्ये काय बदल केल्यावर पाणीपुरवठा सुरळीत होईल, याचा अभ्यास जल अभियंता यांनी करावा. सर्वांना समान पाणीवाटप झाले पाहिजे, अशा सूचना यावेळी करण्यात आल्या. तेव्हा पाण्याचे योग्य नियोजन करायला जल अभियंता यांना सांगण्यात आले आहे. उद्या, सोमवारी याबाबत आयुक्तांनी बैठक आयोजित केली आहे. त्यामध्ये आढावा घेऊन नियोजन निश्चित केले जाणार असल्याचे वरिष्ठ अधिकाºयांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत सभापती ढवळे, सत्यजित कदम, गीता गुरव, दीपा मगदूम यांनी चर्चेत भाग घेतला.
शहरात तीन ते चार गळतीमधून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. या कामाची निविदा जादा दराने आल्याने वारंवार फेरनिविदा काढल्या जात आहेत. वर्षभर पाणी वाया जात आहे. अजूनही येथून पुढे पाणी वाया जाणार. जल अभियंत्यांनी एका महिन्यात गळती दूर केली नाही तर त्यामधून गळतीद्वारे वाया जाणाºया पाण्याचा खर्च निश्चित करून संबंधितांना नुकसानीस जबाबदार धरले जाईल, असा इशारा डॉ. संदीप नेजदार, सत्यजित कदम यांनी दिला.
‘अमृत’मधून पिण्याच्या पाण्याची १०८ कोटींची निविदा मंजूर झाली आहे. त्याचे काम कधी सुरू होणार अशी विचारणा अफजल पीरजादे यांनी केली. तेव्हा ठेकेदारास वर्क आॅर्डर दिलेली आहे. ११ आॅक्टोबरला आयुक्तांनी बैठक बोलावली आहे. ठेकेदाराकडून डिझाईनचे काम सुरू आहे. पाईपची संख्या जास्त असल्याने कामाला दोन वर्षे लागणाार आहेत, असा खुलासा करण्यात आला.