कोल्हापूर : राज्य सरकारने १५ जुलैपर्यंत गाय दूध उत्पादकांच्या खात्यावर प्रतिलिटर पाच रुपये अनुदान जमा करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अन्यथा १६ जुलैपासून बेमुदत दूध संकलन बंद करण्यात येईल. मुंबईला जाणाऱ्या सर्व रस्त्यांची नाकेबंदी करून दुधाचा एक थेंबही जाऊ देणार नाही, प्रसंगी कायदा हातात घेऊ, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिला.खासदार शेट्टी म्हणाले, दुधाचे खरेदी दर कमी झाल्याने गाय दूध उत्पादक कमालीचा अडचणीत सापडला आहे. या संकटाची पूर्वसूचना दीड वर्षापूर्वी केंद्रीय कृषिमंत्र्यांना दिली होती. त्याला सावरण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला पाहिजे, यासाठी २९ जून रोजी दुग्ध आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला.
शेजारील राज्यांप्रमाणे दुधास प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याबाबत राज्य सरकारने १५ जुलैपर्यंत निर्णय घ्यावा. राज्यात रोज एक कोटी लिटर गाय दूध उत्पादन आहे. प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्यासाठी पाच कोटी लागतात. हे संकट कमी होण्यासाठी तीन-चार महिन्यांंचा कालावधी लागेल, त्यासाठी सरकारने साडेचारशे कोटीची मदत करणे अपेक्षित आहे.डेन्मार्क, न्यूझीलंड, आॅस्ट्रेलियामध्ये असेच संकट आहे, तेथील शेतकऱ्यांनी गार्इंचे संगोपन बंद करून कत्तलखान्याकडे पाठवल्या, येथे तेही करता येत नाही. केंद्र सरकारने अतिरिक्त पावडर खरेदी करून त्याचा बफर स्टॉक करणे अपेक्षित होते; पण तसे न केल्याने पेच निर्माण झाला.
आता दूध संघांनाही आवाहन आहे, आमच्या लढाईत त्यांनी साथ द्यावी. आमच्या आडवे येऊ नका. सरकारने अनुदानाचा निर्णय घेतला तर ठीक, अन्यथा आंदोलनाचा वणवा पेटणार असून त्याच्या तयारीसाठी कोल्हापुरात ६ जूलै रोजी दूध उत्पादकांचा मेळावा घेणार असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले. यावेळी प्रा. जालंदर पाटील, अनिल मादनाईक, भगवान काटे, आदी उपस्थित होते.
पावडर अनुदानाचा निर्णय फसलाराज्य सरकारने दूध पावडर उत्पादन करणाऱ्या दूध संघांना प्रतिलिटर तीन रुपये अनुदानाचा निर्णय घेतला. गेले दोन महिन्यांत सरकारचे यावर ५३ कोटी खर्च होऊनही पावडरचे दर पडलेले आहेत. सरकारचा हा निर्णय फसल्याचे शेट्टी यांनी सांगितले.
मुंबईकर दुधासाठी तडफडतीलअकरा वर्षांपूर्वी दूध दरवाढीसाठी असाच संघर्ष केला होता, त्यावेळी मुंबईकडे जाणारे दूध रोखले होते. अहमदाबाद, नाशिक व पुणे या तिन्ही मार्गाने मुंबईत जाता येते, यावेळेला तिथेच नाकाबंदी करून मुंबईत एक थेंबही दुुधाचा सोडणार नाही, त्यामुळे मुंबईकर दुधासाठी तडफडतील, असेही शेट्टी यांनी सांगितले.जिल्हा परिषदेत पाच वर्षे भाजपसोबतचआम्ही शब्दाचे राजकारण करतो, गेले वेळेला कॉँग्रेसला पाच वर्षे साथ देण्याचा शब्द दिला तो पाळला. आताही दिलेल्या शब्दाप्रमाणे सभापती पदाचा राजीनामा दिला. आमचे व प्रकाश आवाडे यांचे चार सदस्य आहेत, पाच वर्षांत चौघांनाही पदे दिली जाणार असून पाच वर्षे भाजपसोबतच राहू, असे शेट्टी यांनी सांगितले.