कोल्हापूर : वीज दरवाढ मागे घ्या, अन्यथा आगामी निवडणुकीत राज्य सरकारला हिसका दाखवू, असा इशारा कोल्हापुरातील उद्योजक, व्यापारी आणि कामगारांनी शुक्रवारी महामोर्चाद्वारे दिला. दरवाढ कमी करण्याच्या मागणीचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी आणि महावितरणचे कोल्हापूर विभागाचे मुख्य अभियंत्यांना निवेदन दिले. मोर्चामध्ये आमदार सतेज पाटील, आमदार डॉ. सुजित मिणचेकर सहभागी झाले.महावितरण कंपनीने केलेली दरवाढीविरोधात कोल्हापुरातील उद्योजक, व्यापाऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. त्याअंतर्गत शुक्रवारचा महामोर्चा काढण्यात आला. या मोर्चासाठी सासने मैदानात सकाळी साडेनऊ वाजल्यापासून उद्योजक, व्यापारी, कामगार येवू लागले. सकाळी अकराच्या सुमारास मोर्चा सुरू झाला. अंगात काळे शर्ट, टी-शर्ट घालून, तर हातात काळे झेंडे, मागण्यांचे फलक घेवून आंदोलनकर्ते मोर्चात सहभागी झाले.
‘अन्यायी वीज दरवाढ रद्द करा’, ‘ दरवाढ रद्द झालीच पाहिजे’, अशा घोषणा देत ते पुढे सरकत राहिला. दाभोळकर कॉर्नर, स्टेशन रोड, उद्योगभवन मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आला. त्याठिकाणी शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना निवेदन दिले. तेथून आदित्य कॉर्नर, अजिंक्यतारा कार्यालयामार्गे महावितरण कार्यालयासमोर मोर्चा पोहोचला. तेथे झालेल्या सभेत उद्योजक, व्यापारी यांनी राज्य सरकार आणि महावितरणचा निषेध केला.
येत्या आठ दिवसांत दरवाढ मागे घ्या, अन्यथा आगामी निवडणुकीत हिसका दाखवू असा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला. या मोर्चात वीजतज्ञ प्रताप होगाडे, ‘महाराष्ट्र चेंबर’चे उपाध्यक्ष ललित गांधी, ‘कोल्हापूर चेंबर’चे अध्यक्ष संजय शेटे, ‘गोशिमा’चे अध्यक्ष लक्ष्मीदास पटेल, माजी अध्यक्ष चंद्रकांत जाधव, ‘स्मॅक’चे अध्यक्ष राजू पाटील, माजी अध्यक्ष सुरेंद्र जैन, ‘मॅक’चे उपाध्यक्ष गोरख माळी, उद्यम सोसायटीच्या अध्यक्षा संगीता नलवडे, इंजिनिअरींग असोसिएशनचे अध्यक्ष नितीन वाडीकर, ‘आयआयएफ’चे सुरेश चौगुले, आदी सहभागी झाले.
विविध संघटनांचा सहभागकोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन, शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन, दि इन्स्टिट्यूट आॅफ इंडियन फौंड्रीमेन, मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आॅफ कागल-हातकणंगले, श्री लक्ष्मी इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, इचलकरंजी इंजिनिअरिंग असोसिएशन, उत्कर्ष उद्योजक संस्था यांनी यात पुढाकार घेतला.
इतर अनेक संघटनांनी या मोर्चाला पाठिंबा दिला आहे. मोर्चामध्ये उद्योजक,व्यापारी, कारखानदार, थियटर मालक, दळप-कांडप असोसिएशन, टिंबर व्यापारी, हॉटेल मालक, मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी, सभासद, उद्योजक त्यांच्या कर्मचाऱ्यांसह रस्त्यावर उतरले.