विश्वास पाटील।कोल्हापूर : महाराष्ट्र विधान परिषदेवर आमदारांच्या मतांतून निवडून देण्यात येणाऱ्या जागेवर कोल्हापूर जिल्ह्याला गेल्या साठ वर्षांत फक्त एकदाच संधी मिळाली आहे. माजी आमदार दिनकरराव जाधव हे या जागेवर सन १९८२ ते ८८ पर्यंत प्रतिनिधित्व करत होते. त्यांच्यानंतर मात्र ही संधी कुणाला मिळालेली नाही. राज्याचा राजकारणावर प्रभाव पाडू शकेल असे नेतृत्व उमेदवार म्हणून आग्रही नसल्याने कोल्हापूरला ही संधी मिळालेली नाही.सध्या या निवडणुकीची चर्चा सुरू आहे. ती बिनविरोध होण्याचीच शक्यता आहे.
राज्याने दखल घ्यावी असे नेते कोल्हापूरने जरूर दिले परंतु त्यांचे स्वत:चे सुरक्षित मतदारसंघ होते व आहेत. त्यामुळे त्यांना विधान परिषदेवर जाण्यासाठी फारशी धडपड करावी लागली नाही. कोल्हापुरातून विधानसभेवरून विधान परिषदेच्या जागेवर राष्ट्रवादीकडून ए. वाय. पाटील व भाजपकडून धनंजय महाडिक यांच्या नावांची चर्चा झाली; परंतु राज्यपातळीवर कुठेच त्या-त्या पक्षांच्या निर्णयप्रक्रियेत या नावांचा साधा उल्लेखही झाला नाही. ए. वाय. पाटील यांनी माजी आमदार के. पी. पाटील यांच्यासाठी माघार घेतली असली तरी के. पी. यांचा पराभव ते रोखू शकले नाहीत. दीड तालुकावगळता त्यांचा राजकीय प्रभावही मर्यादित आहे. त्यामुळे जरी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी ‘शब्द’ दिला असला तरी त्यांना संधी मिळाली नाही. पक्षीय पातळीवर ताकदही पणाला लावली गेली नाही. माजी खासदार महाडिक यांचा भाजपकडून विचार होण्याची शक्यताही नव्हतीच. कारण ते लोकसभेला पराभव झाल्यावर भाजपमध्ये आले आहेत. त्यांना पक्षात संघटनात्मक पद दिले होते. आता कुठे त्यांनी पक्षीय काम सुरू केले आहे.
आतापर्यंत या जागेवर कोल्हापुरातून फक्त दिनकरराव जाधव यांनाच संधी मिळाली आहे. राधानगरी-भुदरगड मतदारसंघातून दिनकरराव जाधव हे सन १९७८ च्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाले परंतु पुलोदचे सरकार पडल्यावर राज्यात लगेच सन १९८० ला निवडणुका लागल्या. त्यामध्ये काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणातून दिनकरराव जाधव विद्यमान आमदार असतानाही त्यांना डावलून तिथे हरिभाऊ कडव यांना उमेदवारी मिळाली. दिनकरराव जाधव हे उमद्या मनाचे. ते कडव यांना उमेदवारी जाहीर होताच त्यांच्या घरी गेले. तुमचे माझे राजकारण वितुष्ट असले तरी आपल्या दोघांचा पक्ष एकच आहे व मी तुम्हालाच विजयी करण्यासाठी झगडणार, असा ‘शब्द’ देऊन आले व त्यानुसार ते वागले.
हा त्यांचा प्रामाणिकपणा ज्येष्ठ नेते वसंतदादा पाटील यांनी लक्षात ठेवला. त्यांनी पुढे सन १९८२ ला काँग्रेसकडून जाधव यांना विधानपरिषदेवर संधी दिली. त्यांची उमेदवारी जाहीर झाली तेव्हा दिनकरराव जाधव हे शेतात होते. भुदरगड पोलीस त्यांच्या गावी गेले व वसंतदादांनी तुम्हाला मुंबईला बोलावले आहे, असा निरोप देऊन आले तेव्हा ‘शब्दाच्या राजकारणाला जागणारे नेते’ ते म्हणून हे घडले. आताही सर्व पक्षांचे नेते निवडणुकीत राजकीय अडचण आली की असा ‘शब्द’ देतात, परंतु ते सर्वच ‘शब्द’ पाळायचे झाल्यास विधान परिषद सभागृह किमान तीनशे सदस्यांचे करावे लागेल तसे घडत नाही.
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघकोल्हापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून आतापर्यंत सदाशिव शिदे, दशरथ कांबळे, बाबूराव धारवाडे, अशोकराव जांभळे, त्यानंतर सलग तीनवेळा महादेवराव महाडिक व त्यांच्यानंतर आता पालकमंत्री सतेज पाटील हे प्रतिनिधित्व करत आहेत.