इंदुमती गणेश ।कोल्हापूर : पुरुषप्रधान संस्कृतीच्या झळांमध्ये तावून सुलाखून निघालेल्या महिला आज सर्वच क्षेत्रांमध्ये आघाडीवर आहेत. एकाचवेळी अनेक पातळींवर काम करण्याचे कसब आणि कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या महिलांना पुरोगामी कोल्हापुरात अजूनही कामाच्या ठिकाणी दुय्यमत्त्वाचा सामना करावा लागतो. कितीही उच्च पदस्थ असली तरी आदर्श गृहिणीच्या चौकटीतही तिने अव्वलच असले पाहिजे, अशी कुटुंबीयांची अपेक्षा असते. या विषयावर सायबर महाविद्यालयाच्या प्रा. रेवती पाटील यांनी ‘क्वॉलिटी आॅफ वर्क लाईफ आॅफ वूमेन इन सर्व्हिस सेक्टर : अ स्टडी आॅफ सिलेक्टेड युनिटस् आॅफ कोल्हापूर डिस्ट्रिक्ट’ यावर पीएच.डी. केली आहे. त्यांच्याशी साधलेला हा संवाद...
प्रश्न : या विषयावर संशोधन करण्याचा विचार कसा आला.?उत्तर : मी स्वत: वर्किंग वूमन आहे. कोल्हापूर हे पारंपरिक शहर आहे. येथे महिला कामाच्या ठिकाणी कितीही चांगल्या काम करीत असल्या तरी तिला दुय्यमच वागणूक मिळते. तिने आदर्श गृहिणी असली पाहिजे, अशी कुटुंबाची अपेक्षा असते. या सगळ्या पातळीवर स्वत:ला सिद्ध करताना तिची ओढाताण, ताणतणाव आणि तिला अपेक्षित सहकार्य यांचा विचार होत नाही. आता सगळ्याच सर्व्हिस सेक्टरमध्ये महिलांचे प्रमाण खूप वाढत आहे; त्यामुळे या विषयावर संशोधन करण्याचा निर्णय घेतला.
प्रश्न : कामाच्या ठिकाणी महिलांचा अनुभव कसा आहे.?उत्तर : महिलांना कमी जबाबदारीची किंवा आॅफिसमध्ये बसून राहण्याची कामे दिली जातात. बढतीच्यावेळी डावलले जाते. पुरुषांच्या तुलनेत कमी पगार दिला जातो किंवा टोचणारे बोल ऐकावे लागतात. महिला कामात वरचढ ठरली की, पुरुषांचा इगो दुखावतो, असा महिलांचा अनुभव आहे. बाळंतपणाच्या मोठ्या गॅपनंतर त्या पुन्हा कामावर रुजू होतात तोपर्यंत आस्थापनांच्या कामात आणि तंत्रज्ञानात मोठा बदल झालेला असतो. अशावेळी त्यांना स्वत:ला अपडेट करण्यासाठी व्यवस्थापनाकडून प्रयत्न होत नाहीत, उलट कमी पगार दिला तरी चालतो, अशी मानसिकता असते.संशोधनासाठी शिक्षण, फायनान्स, बँकिंग, टेलिकॉम, इन्श्युरन्स, पोस्टल, आयटी, आरोग्य, कन्सलटन्सी या सहा क्षेत्रांची निवड केली. जिल्ह्यातील बाराही तालुक्यांची निवड केली. नोकरी करणाऱ्या ७०९ महिलांचा सर्व्हे आणि ६८ मॅनेजमेंटमधील अधिकाऱ्यांशी संवाद साधला.पुरुषांच्या तुलनेत महिला प्रामाणिकमहिला पुरूषांच्या तुलनेत खूप प्रामाणिकपणे काम करीत असतात. त्यांची केवळ सुरक्षित-चांगले वातावरण व समान वागणुकीची अपेक्षा असते. घरात त्यांना कुटुंबीयांच्या सहकार्याची गरज असते. एवढे झाले तरी त्या पुरुषांच्या अधिक पटीने कामाचा रिझल्ट दाखवू शकतात. कंपन्यांना त्यांच्या या क्षमतेचा चांगला उपयोग होईल. हे करताना महिलांनीही काळाबरोबर अपडेट राहिले पाहिजे. स्वत:साठी वेळ दिला पाहिजे. संवेदनशीलता हा तिचा स्थायीभाव असला, तरी तिने प्रोफेशनल राहिले पाहिजे.