कोल्हापूर : शहराच्या विविध भागांत महिलांसाठी स्वच्छतागृहे नसल्यामुळे होणारी गैरसोय लक्षात घेऊन, गणेशोत्सव काळात तात्पुरत्या स्वरूपाच्या स्वच्छतागृहांची मोठ्या प्रमाणात सोय करावी, अशा मागणीचे निवेदन शिवसेना शहर शाखेच्या वतीने महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांना देण्यात आले.शिवसेनेचे शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रस यांच्या नेतृत्वाखाली आयुक्तांना भेटलेल्या शिष्टमंडळाने शहरात स्वच्छतागृहे नसल्यामुळे महिलांच्या होणाऱ्या गैरसोईकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले.गणेशोत्सव काळात शहरात जिल्ह्यातून तसेच जिल्ह्याबाहेरून मोठ्या संख्येने भाविक येत असतात. त्यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय असते.
अंबाबाई मंदिरात येणाऱ्या महिला भाविकांचीही संख्या मोठी असते. महिलांकरिता स्वतंत्र स्वच्छतागृहे नसल्यामुळे त्यांची गैरसोय होते; त्यामुळे जास्तीत जास्त तात्पुरत्या स्वच्छतागृहांची सोय करावी, त्यांची रोज स्वच्छता करावी, अशी सूचना शिष्टमंडळाने केली.गणेशोत्सव काळात स्थानिक यात्री निवास, लॉजिंग-बोर्डिंग, हॉटेल्स यांना नोटीस काढून महिलांकरिता मोफत स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्यास सांगावे. त्यासंबंधीचा फलक लॉजिंगसमोर लावण्यास सांगावे, अशी सूचना शिष्टमंडळाने केली.पर्यावरणपूरक गणेश विसर्जन केले जात असताना मूर्तींची विटंबना होणार नाही, याची दखल घ्यावी. गणेशोत्सव काळात महापालिकेकडून शहरात स्वच्छता ठेवावी, औषध फवारणी केली जावी, अशा सूचनाही यावेळी करण्यात आल्या.
शिष्टमंडळात दत्ताजी टिपुगडे, योगेश शिंदे, रवी चौगुले, अभिजित बुकशेट, विराज ओतारी, शशिकांत बिडकर, मेघना पेडणेकर, अभिजित लाड, दीपाली शिंदे, वीरू सांगावकर, दिलीप देसाई, धनाजी यादव, सुजाता सोहनी, कविता सुतार यांचा समावेश होता.