कोल्हापूर : पाणी देण्यावरून झालेला ‘शाब्दिक’ वाद वाढल्याने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील लिपिक महिला आणि शिपाई महिलेमध्ये मंगळसूत्र तुटेपर्यंत मारामारी झाली. या सर्व प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी दिले आहेत.दुपारी १२ च्या दरम्यान या महिला लिपिकाने शिपाई महिलेला पिण्यासाठी पाणी आणायला सांगितले तेव्हा ‘मी तुम्हाला पाणी देण्यासाठी इथे नोकरीला नाही’ अशा पद्धतीने शिपाई महिलेने दुरूत्तर केल्याचे सांगण्यात आले. त्यावरून या दोघांमध्ये सुरुवातीला बाचाबाची झाली नंतर मात्र दोघीही एकमेकींच्या अंगावर धावून गेल्या. त्यात एकीचे मंगळसूत्र तुटले.हा सर्व प्रकार झाल्यानंतर एकीने सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसुळ यांचे दालन गाठले. मात्र, त्यांनी हा सर्व प्रकार ऐकल्यानंतर त्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्याकडे पाठविले तेव्हा मित्तल यांनी या सर्व प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांना दिले आहेत. घडल्या प्रकाराचा आठ दिवसांत अहवाल देण्याचेही या आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे. दिवसभर जिल्हा परिषदेत या प्रकाराची चर्चा सुरू होती.