कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्याच्या कामाचे अंदाजपत्रक सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तपासून घेवून २० जूलैपर्यंत सादर करण्याचे आदेश बुधवारी विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी दिले. जोतिबा मंदिराच्याही पहिल्या टप्प्यातील आराखड्याला तांत्रिक मान्यता घेवून महिना अखेरपर्यंत टेंडर नोटिस काढण्याच्याही त्यांनी सुचना केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत त्यांनी आराखड्याचे काम मार्गी लागण्यासाठी सर्व विभागांनी एकमेकांना सहकार्य करावे असेही सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, डॉ. कुणाल खेमणार, देवस्थान समितीचे सचिव विजय पोवार, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत आदी उपस्थित होते.मुख्यमंत्र्यासमोर अंबाबाई मंदिर विकास आराखड्याचे सादरीकरण झाल्यानंतर त्यांनी त्यात काही बाबींचा समावेश करण्याच्या सुचना केल्या होत्या. त्यानुसार महापालिकेला पहिल्या टप्प्यातील विकास आराखड्यात समाविष्ट असलेल्या दर्शन मंडप, व्हिनस कॉर्नर येथील बहुमजली पार्कींग व यात्री निवास, बिंदू चौक व सरस्वती टॉकीज येथील पार्कींग या कामाचे ठोकळ अंदाजपत्रक तयार करुन घ्यावे लागणार आहे. तरी महापालिकेने हे ठोकळ अंदाजपत्रक तयार करावे व ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तपासून घेवून २० तारखेपर्यंत सादर करावे असा आदेश विभागीय आयुक्तांनी दिला.यावेळी जोतिबा मंदिराच्या पहिल्या टप्प्यातील विकास आराखडा २५ कोटींचा असून ५ कोटींचा निधी शासनाकडून वर्ग झाला आहे. मात्र या आराखड्यातील ७ कोटींच दर्शन मंडपाचा प्रस्ताव बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता पुणे यांच्याकडे तांत्रिक मान्यतेसाठी पाठवण्यात आला आहे. तर ३ कोटी ५६ लाखाच्या स्वच्छतागृहाचा प्रस्ताव नगररचना विभागाच्या मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे. त्यामुळे निधी येवूनही विकास आराखड्याचे काम सुरू झालेले नसल्याचे सांगण्यात आले.
आर्किटेक्ट राजू सावंत यांनी आराखड्याची माहिती दिली. यावर विभागीय आयुक्त म्हैसेकर यांनी दर्शन मंडपाच्या प्रस्तावाला चार दिवसात मान्यता दिली जाईल त्यानंतर जूलै अखेर या कामाचे टेंडर नोटिस काढण्याचे आदेश दिले. तसेच स्वच्छतागृहाच्या मंजूरीसाठी सर्व विभागांनी सहकार्य करा व आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील कामाची मुदत निश्चित करून ती ठरलेल्या वेळेत पूर्ण करा असे सांगितले.