कोल्हापूर : चौदाव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून ग्रामपंचायतींना विकासासाठीचे मोठे शस्त्र मिळाले आहे. हे शस्त्र हातात राहण्यासाठी सरपंच, सदस्यांनी जबाबदारीने काम करणे आवश्यक आहे. त्यासह विकासाची पावले अबाधित राहण्यासाठी ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाचे स्रोत भक्कम करावेत, असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी गुरुवारी येथे केले.कोल्हापूर जिल्ह्यातील ‘लोकमत सरपंच अवॉर्डस्’ने सन्मानित झालेल्या १३ ग्रामपंचायतींना आमदार सतेज पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून संगणक, प्रिंटर प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत होते.
शिवाजी उद्यमनगरमधील रामभाई सामाणी हॉलमधील या कार्यक्रमास ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले, वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, मुख्य बातमीदार विश्वास पाटील प्रमुख उपस्थित होते. आमदार सतेज पाटील म्हणाले, चौदाव्या वित्त आयोगाचे शस्त्र गावातच राहण्यासाठी चांगली कामे करणे आवश्यक आहे. त्यामध्ये काही त्रुटी राहिल्यास ही योजना बंद होऊ शकते; त्यामुळे हे शस्त्र हातातून जाणार नाही, याची दक्षता घ्यावी.
सरपंचपदाची जबाबदारी मोठी असते. या पदावर काम करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशा स्थितीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सरपंचांना पुरस्काराने सन्मानित करण्याचा ‘लोकमत’चा उपक्रम चांगला आहे. ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ने सन्मानित झालेल्या ग्रामपंचायतींनी आपल्या तालुका, जिल्ह्यातील अन्य सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांना प्रोत्साहित करावे. आपण राबविलेल्या उपक्रमांची माहिती द्यावी. सरपंच, सदस्यांनी गावाला अभिमानास्पद वाटेल असे काम करावे.या कार्यक्रमात ‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांच्या हस्ते आमदार सतेज पाटील यांचा सत्कार करण्यात आला. संपादक वसंत भोसले यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, राज्यातील १९ जिल्ह्यांमध्ये ‘लोकमत सरपंच अवॉर्डस्’चा कार्यक्रम घेण्यात आला. कोल्हापुरातून त्याची सुरुवात झाली. या अवॉर्डस्साठी जिल्ह्यातून ३२२ प्रस्ताव आले. त्यांतून विविध निकष लावून १३ ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली.
ग्रामपंचायती या शासकीय योजना कशा पद्धतीने राबवितात, विकासाभिमुख उपक्रम कसे राबविले जातात, आदींचे मूल्यमापन करण्यात ‘लोकमत सरपंच अवॉर्डस्’ उपक्रम यशस्वी ठरला. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये खूप चांगले काम सुरू आहे. त्याला आमदार सतेज पाटील यांनी बळ दिले आहे.
पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी तेरा ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामविस्तार अधिकारी, कर्मचारी, आदी उपस्थित होते. प्राचार्य महादेव नरके यांनी आभार मानले.
कचरा व्यवस्थापनासाठी ‘क्लस्टर’चा विचार करावाजिल्ह्यात कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न गंभीर होत आहे. त्यातून भांडणे, वाद सुरू आहेत. अशा स्थितीत शिरोली, सांगरूळसारख्या गावांनी पुढाकार घेऊन आपल्या सभोवती तीन-चार गावांना घेऊन कचरा व्यवस्थापनासाठी क्लस्टरच्या माध्यमातून प्रकल्प उभारावा, असे आवाहन आमदार पाटील यांनी केले. ते म्हणाले, निर्मल ग्राम, स्वच्छता अभियानाप्रमाणे आता प्रत्येक ग्रामपंचायतीने सांडपाणी निर्गतीकरणावर भर द्यावा. रस्ते करण्याआधी गटारी कराव्यात. कचरा व्यवस्थापनासाठी ‘लोकमत’ने मोहीम राबवावी.
या ग्रामपंचायतींना दिले संगणक, प्रिंटरशिरोळ, नांदणी (ता. शिरोळ), गोरंबे (ता. कागल), सांगरूळ, गडमुडशिंगी (ता. करवीर), किणी, शिरोली पुलाची, लाटवडे (ता. हातकणंगले), मुदाळ (ता. भुदरगड), उत्तूर, भादवण (ता. आजरा), नेसरी, ऐनापूर (ता. गडहिंग्लज) या ग्रामपंचायतींना संगणक, प्रिंटर देण्यात आले.