कोल्हापूर : पाच वर्षे टक्केवारीपासून दूर रहा, कोणतीही अपेक्षा न करता सर्वांना सोबत घेऊन भ्रष्टाचारविरहित काम करा, गटातटाच्या राजकारणात पडून एकमेकाची जिरवाजिरवी करण्यापेक्षा विकासाची दृष्टी ठेवा, पद हे पाच वर्षापुरतेच असल्याने राजकारण डोक्यात न ठेवता निरपेक्ष भावनेने व नैतिकतेने काम करा, यामुळे तुमचे नाव नेहमीच्या ग्रामस्थांच्या स्मरणात राहील, असा कानमंत्री विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी शनिवारी येथे दिला.मार्केट यार्ड येथील शाहू सांस्कृतिक मंदीर येथे जिल्हा परिषदेतर्फे आयोजित यशवंत सरपंच पुरस्कार व आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्रदान समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होेते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक होत्या.
प्रमुख उपस्थिती जिल्हा परिषद उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, बांधकाम समिती सभापती सर्जेराव पाटील-पेरिडकर, शिक्षण समिती सभापती अंबरिषसिंह घाटगे, महिला व बालकल्याण समिती सभापती शुभांगी शिंदे, पाटोदा (जि.औरंगाबाद)चे सरपंच भास्कर पेरे-पाटील, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजीत देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.प.) राजेंद्र भालेराव, मुख्य लेखाधिकारी संजय राजमाने, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प अधिकारी डॉ. एच. टी. जगताप आदींची होती.
यावेळी विभागीय आयुक्त दळवी यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत ‘यशवंत सरपंच पुरस्कार’, ‘आदर्श ग्रामसेवक पुरस्कार’, ‘यशवंत ग्रामपंचायत पुरस्कार’यांचे वितरण करण्यात आले.चंद्रकांत दळवी म्हणाले, सरपंचांनी निवडून आल्यावर पंधरा दिवसात ग्रामसभा घेऊन गावच्या अडचणी समजून घ्यायला पाहीजेत. जिल्हा परिषदेमध्ये जसे नवीन सभागृह असित्वात आल्यावर सर्वजण पक्षभेद विसरतात, त्याप्रमाणे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतरही सरपंच व सदस्यांनी गटतट व राजकारण बाजूला ठेवून विकासाचे राजकारण केले पाहीजे.
ते पुढे म्हणाले, सरपंच व सदस्यांनी ग्रामपंचायत कायदा समजून घेतल्यास ग्रामसेवकांबरोबर होणारे वादाचे प्रसंग थांबतील. तसेच ग्रामसेवक खरे बोलतोय की खोटे हे सुध्दा समजून येईल.शौमिका महाडिक म्हणाल्या, ग्रामविकास यंत्रणेतील सर्वच घटकांनी नेहमी सकारात्मक दृष्टीकोनातून योजनांची अंमलबजावणी करण्यावर भर द्यावा. भास्कर पेरे-पाटील म्हणाले, माझ्या गावाला दोनवेळा राष्ट्रपती पुरस्कार, स्मार्ट व्हिलेजचा पुरस्कार मिळाला आहे.
सर्वांना सोबत घेऊन विकासाची दृष्टी ठेवल्याने गावाचा नावलौकिक झाला आहे. गाव स्मार्ट बनविण्यासाठी सरपंच व ग्रामसेवकाशिवाय पर्याय नाही. ‘लोकमत’चे पत्रकार समीर देशपांडे यांचे भाषण झाले. खेमणार यांनी प्रास्ताविक केले. संदीप मगदूम व सविता कुंभार यांनी सुत्रसंचालन केले. भालेराव यांनी आभार मानले.