इंदूमती गणेशकोल्हापूर : कारागृह हा शब्द ऐकला, तरी उंच उंच दगडी भिंती, बरॅकला धरून उभे असलेले कैदी, जाळीच्या पलिकडून बोलणारे नातेवाईक आणि बंदिस्त जग डोळ्यासमोर येतं; पण या गजाआडच्या जगातही स्वच्छंदी जगणाऱ्या लहानग्या बाळाचे निरागस हास्य कैद्यांनाच नव्हे, तर वर्दीआड दडलेल्या माणूसपणालाही साद देते. कळंबा कारागृहात शून्य ते सहा वर्षे वयोगटांतील महिन्याकाठी किमान पाच ते सहा बालकांचे बालपण जपले जाते.आयुष्याच्या एका वळणावर हातून घडलेल्या गुन्ह्याची शिक्षा म्हणून व्यक्तीची रवानगी कारागृहात होते. आठ महिन्यांची गरोदर असताना एका महिलेसह तिच्या पतीवर खुनाचा गुन्हा नोंद झाला आणि दोघेही कारागृहात आले. या महिलेने अडीच महिन्यांपूर्वी एका गोंडस मुलीला जन्म दिला आणि कारागृहात मंगळवारी (दि. १) धुमधडाक्यात बारसं घालून या चिमुकलीला ‘दुर्गा’ हे नाव दिलं गेलं.
कारागृहाच्या बंद दरवाजाआडही येथील बालकांचे बालपण जपण्याचा प्रयत्न.कारागृह ही सुधारगृह व्हावी, या उद्देशाने कळंबा जेल प्रशासनाकडून कैद्यांसाठी शिक्षण, गळाभेट, अंबाबाईचा लाडू प्रसाद, रोजगार, प्रशिक्षण, असे विधायक उपक्रम राबविले जात आहेत; पण एका चिमुकलीचे बारसे होण्याची ही कारागृहाच्या इतिहासात पहिलीच वेळ होती.
बालहक्क आणि कायद्यानुसार कोणत्याही मातेला तिच्या बाळापासून वेगळे करता येत नाही. मग ती महिला गुन्हेगार असली तरी. महिला कैदीसोबत कारागृहात तिची शून्य ते सहा वर्षांपर्यंतची बालके राहू शकतात. कळंबा कारागृहात सध्या ७० महिला कैदी आहेत. त्यातील एका महिलेला दोन व अन्य तिघींना एक एक मूल आहे. काही दिवस किंवा एक-दोन वर्षांसाठी शिक्षा भोगण्यासाठी आलेल्या महिला कैदी मुलांसोबत राहतात आणि शिक्षेचा कालावधी संपला, की निघून जातात. अशा रीतीने महिन्याला किमान पाच ते सहा महिला कैदी बालकांसमवेत कारागृहात येत-जात असतात.
खेळणीपासून अंगणवाडीपर्यंत..कारागृहात मातेची व नवजात शिशूची छान काळजी घेतली जाते. तिच्यासाठी स्वतंत्र खोली दिली जाते. मातेला सकस आहार, बालकाचे सुयोग्य संगोपन, औषधोपचार, अगदी खेळणीपर्यंतच्या सोईसुविधा पुरवल्या जातात. अनेकदा येथील महिला कर्मचाऱ्यांची मुलंही या लहानग्यांसोबत छान रमतात.
भायखळा, येरवडा या कारागृहांमध्ये शून्य ते सहा वर्ष वयोगटातील २५ ते ३० बालके असतात; त्यामुळे त्यांच्यासाठी कारागृहातच अंगणवाडी चालवली जाते. त्यासाठी शिक्षीका, अंगणवाडी सेविका, मदतनीसांची नेमणूक केली जाते; पण कळंबा कारागृहात सरासरी पाच ते सहा बालके असतात. सध्या त्यातील दोनच बालके अंगणवाडीला जाण्याच्या वयाची असल्याने त्यांना कळंब्यातील अंगणवाडीत पाठविले जाते. कारागृहाचे कर्मचारीच त्यांची ने-आण करतात.
जन्माचे गुपितएखाद्या बालकाचा कारागृहात जन्म झाला, की आयुष्यभर त्याच्यावर ठपका बसतो. या ठपक्याखाली त्यांचे बालपण चिरडले जाऊ नये, यासाठी कारागृह प्रशासनाकडून बाळाच्या जन्मदाखल्यावर कारागृहाचा नामोल्लेखही केला जात नाही. ‘सीपीआर’सारख्या दवाखान्याचे नाव या जन्मदाखल्यावर असते.
रवानगी बालकल्याण संकुलात...सहा वर्षांनंतर बालकांना भोवतालच्या परिस्थितीची जाणीव येत असते. आपण कारागृहात राहतोय, ही भावना त्यांच्या मनावर विपरीत परिणाम करणारी ठरू शकते; त्यामुळे सहा वर्षांनंतरच्या बालकांना पालकांच्या परवानगीने कैद्यांच्या कुटुंबीयांकडे किंवा बालकल्याण संकुलसारख्या संस्थांमध्ये पाठविले जाते.
नवजात बालकांच्या संगोपनात पहिली सहा वर्षे खूप महत्त्वाची असतात; त्यामुळेच कारागृहात त्यांचे बालपण जपण्याचा प्रयत्न केला जातो. ही बालके येथे छान रमतात, महिला कर्मचाºयांच्या मुलांसोबत खेळतात, त्यांचे हे विश्व आम्हा सर्वांनाही आनंदून जाते.शरद शेळके, अधीक्षक, कळंबा कारागृह