कोल्हापूर : अन्य जिल्ह्यांतून कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या शिक्षकांनी अजाणतेपणाने बदली होऊन आलेली तारीख अर्जामध्ये लिहिल्यामुळे सेवाज्येष्ठतेच्या आधारे त्यांच्या बदल्या झाल्या. मात्र ही जाणीवपूर्वक केलेली चूक नसून, ती तांत्रिक चूक असल्याचा निष्कर्ष जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने काढला आहे.दहा तालुक्यांतील ६१ शिक्षकांनी खोटी माहिती भरून बदल्या करून घेतल्यावरून या सर्वांना सुनावणीसाठी मंगळवारी कोल्हापूर जिल्हा परिषदेत बोलावण्यात आले होते. समिती सभागृहामध्ये शिक्षण सभापती अंबरीश घाटगे आणि प्रभारी शिक्षणाधिकारी रविकांत आडसूळ यांच्यासह शिक्षण विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.यावेळी प्रत्येक शिक्षक, शिक्षिकेला बोलावून त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. यातील बहुतांश शिक्षकांनी सेवा सुरू झाल्याची पहिली तारीख लिहिण्याऐवजी कोल्हापूर जिल्ह्यात सेवा सुरू झाल्याची तारीख लिहिली होती; परंतु ही चूक हेतुपूर्वक केली नसल्याने या शिक्षकांबाबत गंभीर कारवाई करणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.संवर्ग २ हा ‘पती-पत्नी सोय’ असून, यात एकाच शिक्षकाने खोटी माहिती भरल्याचे स्पष्ट झाले असून, या शिक्षकाची पुन्हा शाहूवाडीत बदली करण्यात येणार असल्याचे समजते. शिरोळ आणि हातकणंगले या दोन तालुक्यांतील शिक्षकांची सुनावणी अजूनही बाकी आहे. एकूणच तक्रारींचे स्वरूप, कारवाई न करण्यासाठी लोकप्रतिनिधींचा दबाव या सगळ्यांचा परिणाम म्हणजे अतिगंभीर चुकीची माहिती भरलेल्या शिक्षक-शिक्षिकांवरच कारवाई होऊ शकते. मात्र ही संख्या नगण्य आहे.खासगी ठेकेदाराकडची नोकरी दाखविली शासकीयशाहूवाडी तालुक्यात कार्यरत असणाऱ्या एका शिक्षकाने आपली शाहूवाडीतून ‘पती-पत्नी सोय’ या निकषानुसार बदली व्हावी यासाठी चक्क आपल्या पत्नीलाच शासकीय कर्मचारी बनविले! आपली पत्नी ही गव्हर्न्मेंट रजिस्टर्ड ठेकेदाराकडे नोकरीस असल्याची त्याने माहिती भरली.
या शिक्षकाच्या कागदपत्रांची छाननी केली असता त्याची पत्नी शासकीय नव्हे तर शासनमान्य नोंदणीकृत ठेकेदाराकडे क्लार्क म्हणून काम करीत असल्याचे स्पष्ट झाले. या शिक्षकाला पुन्हा शाहूवाडीलाच टाकण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.