कोल्हापूर : कोल्हापूरचे ज्येष्ठ संगीतकार दत्ता डावजेकर यांचा दिग्गज संगीतकारांशी परिचय असल्यामुळे ते यशवंत देव त्यांच्याकडे अनेकदा येत. १९८८ मध्ये ‘डीडी’ ऊर्फ दत्ता डावजेकर यांचे चिरंजीव विनय डावजेकर यांनी त्यांच्या शुक्रवार पेठेतील ज्ञानेश्वरी बंगल्याच्या गच्चीवर यशवंत देव यांची संगीत मैफल रंगविली.
‘जिव्हाळा’ या नावाने हा उपक्रम अनेक वर्षे सुरू होता. त्यानंतर ‘डीडीं’च्या स्मरणार्थ दत्ता डावजेकर फौंडेशनमार्फत संगीत आणि चित्रपट क्षेत्रांत उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना पुरस्कार देण्यास २००७ पासून सुरुवात केली. पहिला ‘जीवनगौरव’ पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांना मुंबईत त्यांच्या निवासस्थानी यशवंत देव यांच्या हस्ते देण्यात आला.
डावजेकर कुटुंबीयांचा देव यांच्याशी मोठा ऋणानुबंध होता. त्यामुळे १५ नोव्हेंबर २००८ रोजी कोल्हापुरात केशवराव भोसले फौंडेशनमार्फत यशवंत देव यांना ज्येष्ठ सतारवादक अरविंद मयेकर यांच्या हस्ते ‘जीवनगौरव’ पुरस्कार आणि अंबाबाईची भव्य प्रतिमा भेट देण्यात आली होती. ‘लोकमत’ या सोहळ्यात सहभागी झाला होता.
याच कार्यक्रमात संगीत क्षेत्रात उत्कृष्ट काम केल्याबद्दल गायक सलील कुलकर्णी आणि हलकेफुलके संगीत तसेच चित्रपट संगीताच्या प्रसाराचे काम करणाºया ‘स्मृतिगंध लिसनर्स क्लब’ या संस्थेलाही देव यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला होता.
यावेळी श्रीकृष्ण कालगावकर, प्रभाकर तांबट, धनंजय कुरणे यांनी तो पुरस्कार स्वीकारला. या कार्यक्रमासाठी यशवंत देव यांच्या पत्नी करुणा देव, अपर्णा मयेकर, मृणालिनी डावजेकर यांच्यासह ‘लोकमत’चे तत्कालीन निवासी संपादक राजा माने उपस्थित होते. दुर्दैवाने काही कारणांमुळे दरवर्षी देण्यात येणारे पुरस्कार स्थगित झाले होते. त्यानंतर विनय डावजेकर यांचेही निधन झाल्याने या समारंभालाच पूर्णविराम मिळाला.