संतोष मिठारी
कोल्हापूर : इयत्ता दहावी आणि आठवीची पुनर्रचित पाठ्यपुस्तकांच्या उपलब्धतेबाबत गेल्यावर्षी झालेल्या इयत्ता नववीसारखी अवस्था व्हायला नको. ही पुस्तके मार्चअखेर मिळावीत. त्यासह शिक्षकांना प्रशिक्षण वेळेत व्हावे, अशी मागणी पालक आणि शिक्षकांतून होत आहे.
गेल्यावर्षी शासनाकडून इयत्ता नववीची पुस्तके ही जून महिना सुरू झाला, तरी विद्यार्थ्यांना उपलब्ध झाली नव्हती. शाळा सुरू झाल्यानंतर दहा दिवसांनी संबंधित पुस्तके बाजारात उपलब्ध झाली. या अभ्यासक्रमांबाबत शिक्षकांनादेखील वेळेत प्रशिक्षण मिळाले नव्हते. त्याचा त्रास विद्यार्थ्यांना सहन करावा लागला. अशी अवस्था यावर्षी इयत्ता दहावी आणि आठवीबाबत होऊ नये.
सन २०१२ मध्ये दहावी आणि आठवीच्या अभ्यासक्रमाबाबत प्रस्तावित केलेल्या बाबींचा समावेश करून पुनर्रचित नवीन पाठ्यपुस्तके यावर्षी उपलब्ध करून दिली जाणार आहे.
दहावीचे जादा तास हे एप्रिलपासून सुरू होतात. त्यामुळे नव्या अभ्यासक्रमाची दहावीची पुस्तके वेळेत उपलब्ध झाली नाहीत, तर विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम वेळेत पूर्ण होणार नाही.
दहावीचे वर्ष हे विद्यार्थ्यांच्या करिअरची दिशा ठरविणारे असते. ते लक्षात घेऊन शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने संबंधित पुस्तके मार्चअखेर उपलब्ध करून देणे आवश्यक ठरणार आहे.
दहावी आणि आठवीची नवीन अभ्यासक्रमाची पुस्तके विद्यार्थ्यांना मार्चअखेर उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्यासह या अभ्यासक्रमाबाबत एप्रिलपूर्वी संबंधित इयत्तांच्या शिक्षकांचे प्रशिक्षण व्हावे. वेळेत प्रशिक्षण झाल्यास ते विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी उपयुक्त ठरते. त्यादृष्टीने शिक्षण विभागाकडून कार्यवाही व्हावी.- राजेश वरक,अध्यक्ष, माध्यमिक शिक्षक संघ कोल्हापूर.
गेल्यावर्षी नववीची पुस्तके वेळेत मिळाली नसल्याने विद्यार्थी आणि पालकांना मोठा त्रास झाला. त्याची पुनरावृत्ती यावेळी होऊ नये अशी अपेक्षा आहे. विद्यार्थी हित लक्षात घेऊन शासनाने वेळेत पुस्तके उपलब्ध करून द्यावीत.- अतुल शिंदे,पालक, नागाळा पार्क.
पुस्तके असणार अशी
या पुनर्रचनेत दहावीची पुस्तके मराठी, हिंदी पूर्ण, हिंदी संयुक्त, संस्कृत पूर्ण, संस्कृत संयुक्त, इंग्रजी, बीजगणित, भूमिती, विज्ञान एक आणि दोन, इतिहास-नागरिकशास्त्र-राज्यशास्त्र, भूगोल-अर्थशास्त्र अशी असणार आहेत. मराठी, हिंदी, संस्कृत, इंग्रजी, गणित, विज्ञान, इतिहास आणि भूगोल अशी इयत्ता आठवीची पुस्तके राहणार आहेत.