कोल्हापूर : छत्रपती शिवरायांबद्दल कोणीही जाहीर वक्तव्य करते. त्याबाबत संहिता लागू करण्याच्या मागणीसाठी कोल्हापुरातील युवक शुभम शिरहट्टी याने स्वत:च्या रक्ताने थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहिले आहे. शुभम हा शाहू सेनेचा जिल्हाध्यक्ष आहे.खोटा इतिहास, अफवा पसरविण्यात येत असल्याने महाराष्ट्रवासियांची मनं व्यथित होत आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे वक्तव्य, सत्तेच्या हव्यासाच्या बंडाची तुलना शिवपराक्रमाशी होणे, अवमान, विटंबना हे काय महाराष्ट्राच्या पचनी पडू शकणार नाही. त्यामुळे शिवरायांबद्दल कोणीही जाहीर वक्तव्य करताना एकप्रकारची संहिता लागू करावी, जेणेकरून त्याचे तंतोतंत पालन होईल. करवीरनगरीतील या शिवशाहूभक्ताच्या रक्ताच्या पत्राची दखल आपण घ्यावी, अशी विनंती शुभम याने या पत्राद्वारे केली आहे.
शिवरायांच्या अवमान आम्ही सहन करुन घेणार नाही. सर्व कोल्हापूरकरांच्या वतीने राष्ट्रपतींना मी रक्ताने पत्र लिहिले आहे. त्यावर योग्य कार्यवाही होईल अशी अपेक्षा आहे. जे लोकप्रतिनिधी महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य करतील, त्यांची पहिल्यांदा पदावरुन हकालपट्टी करावी. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी - शुभम शिरहट्टी